Google Investment : आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर भारतात उभारणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ ऑक्टोबर | Google India Investment : गेल्या १० वर्षांचा कालावधी आपण पाहिला तर जगात आयटी (IT) क्षेत्र झपाट्याने वाढल्याचं दिसतं. अनेक देशांनी या क्षेत्रात मोठं योगदान देत मोठ्या प्रमाणात प्रगती केल्याचं पाहायला मिळतं. भारतही या क्षेत्रात आता मागे राहिलेला नाही. भारतात अनेक आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून आता भारतही झपाट्याने डिजिटल जगाकडे वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे.

गुगलने एक महत्वाचा निर्णय घेतला असून गुगल आता भारतात तब्बल १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये गुगल आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर उभारणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश हे राज्य आता भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय AI हब बनणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतात दरवर्षी लाखो नोकऱ्या निर्माण होणार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

गुगल कोणत्या प्रकल्पात ही गुंतवणूक करणार?
समोर आलेल्या वृत्तानुसार, गुगल आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये तब्बल १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये विशाखापट्टणम येथे १ गिगावॅट क्षमतेचा डेटा सेंटर कॅम्पस उभारणार आहे. त्यामध्ये डेटा सेंटर, एआय, विस्तारित फायबर-ऑप्टिक नेटवर्क यासह आदी प्रकल्पांचा समावेश असणार आहे.

या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अल्फाबेट इंक आंध्र प्रदेशात एक भव्य डेटा सेंटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) हब स्थापन करण्यासाठी १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. ही दक्षिण आशियाई राष्ट्रातील सर्वात मोठी गुंतवणूक असेल. मंगळवारी या करारावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या जगातील अनेक मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. असं असतानाच गुगलने हे ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. गुगल हे नवीन डेटा सेंटर उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी म्हटलं की, “अशा उपक्रमांमुळे, गुंतवणुकीमुळे धोरणात्मक फायदा होईल.”

सुंदर पिचाई यांनी काय म्हटलं?
“विशाखापट्टणममध्ये गुगल एआय हबसाठी आमच्या योजनांबाबत भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर चर्चा झाली. खूप छान वाटलं. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. हे हब गिगावॅट-स्केल संगणक क्षमता, एक नवीन आंतरराष्ट्रीय आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा एकत्रित करणारा प्रकल्प आहे. त्यामाध्यमातून आम्ही भारतातील उद्योग आणि वापरकर्त्यांपर्यंत उद्योग आणि अग्रणी तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच एआयला गती देऊ आणि देशभरात वाढ करू”, असं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *