महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ ऑक्टोबर | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरीज सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पुन्हा मैदानात पाहायची आतुरता आहे. क्रिकेटविश्वात सध्या या दोघांच्याच चर्चा रंगल्या आहेत. रोहितकडून कर्णधारपद गेल्यानंतर अनेक दिग्गजांनी आपली मते मांडली, पण आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही अखेर या विषयावर मौन तोडले आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये जबरदस्त विजय मिळवला आणि त्यानंतर गंभीर यांनी रोहित आणि कोहलीबद्दल खुलेपणाने बोललं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्तीची चर्चा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरीज 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, काही माध्यमांमध्ये अशी बातमी समोर आली आहे की या सीरीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्तीची घोषणा करू शकतात. अशीही अट ठेवण्यात आली होती की जर दोघांनाही पुढील वर्ल्ड कप खेळायचा असेल, तर त्यांना विजय हजारे ट्रॉफी किंवा घरगुती क्रिकेटमध्ये सातत्याने खेळावं लागेल. याच मुद्द्यावर गौतम गंभीर यांना प्रश्न विचारण्यात आला.
काय म्हणाले गौतम गंभीर?
गंभीर यांना विचारलं गेलं की, पुढील दोन वर्षांत रोहित-कोहली निवृत्ती घेतील असं तुम्हाला वाटतं का? यावर गंभीर म्हणाले, “50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप अजून सुमारे दोन-साडे-दोन वर्षांवर आहे. सध्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. हे दोघे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांचा अनुभव ऑस्ट्रेलियात नक्कीच टीमला उपयोगी पडेल. मला आशा आहे की या दौऱ्यावर त्यांचा खेळ उत्तम होईल आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, संपूर्ण टीमचं प्रदर्शन यशस्वी ठरेल.”
25 ऑक्टोबरला शेवटचा सामना
गंभीर यांनी दोन्ही दिग्गजांच्या भविष्यासंदर्भात मोठं विधान केलं नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या दौऱ्याचा शेवटचा सामना 25 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. आता पाहावं लागेल की ही सीरीज संपल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली घरगुती क्रिकेटमध्ये उतरतात का नाही. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने टेस्ट सीरीज आधीच आपल्या नावावर केली आहे.