मतदार याद्यांतील घोळ दूर करा, मगच निवडणुका घ्या! सर्वपक्षीय शिष्टमंडळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ ऑक्टोबर | लोकशाहीचे बळकटीकरण आणि पारदर्शक निवडणुकांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सलग दुसऱया दिवशी निवडणूक आयोगाला घेरले. राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयावर धडक देत शिष्टमंडळाने मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाचे आणि सत्ताधारी भाजपच्या हस्तक्षेपाचे पुरावेच आयुक्तांसमोर ठेवले. मतदार याद्यांमध्ये असलेल्या त्रुटींबाबत केंद्र सरकारचे प्रतिनिधी असलेले मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त या दोघांनीही जबाबदारी झटकल्याने शिष्टमंडळातील नेते संतप्त झाले. निवडणूक आयोग सत्ताधाऱयांसाठी काम करतोय का, असा सवाल त्यांनी विचारला. या बैठकीनंतर शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मतदार याद्यांमधील घोळ दूर केले जात नाहीत, दुरुस्ती होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी एकमुखी मागणी सर्व नेत्यांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी मतदार याद्यांमधील त्रुटी आधी दूर व्हायला हव्यात, अशी प्रमुख मागणी घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज सकाळी मंत्रालयासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना भेटले. या शिष्टमंडळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, अंबादास दानवे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, अजित नवले आदींचा समावेश होता. या बैठकीनंतर शिष्टमंडळाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना महत्त्वाचे पुरावेही प्रसारमाध्यमांसमोर सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *