महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ ऑक्टोबर | मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं नागरिक बेजार झालेले असतानाच राज्यातील काही भागांमध्ये पुढील 24 तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार पुढच्या 24 तासांमध्ये कोकणासह, मध्य महाराष्ट्रा आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईसह ठाणे आणि पालघर भागातही तुरळक सरींचा अंदाज आहे. तर रायगड (Raigad), रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रत्यक्षात राज्यातून (Monsoon) मान्सून जवळपास माघारी गेला आहे. मात्र मोसमी पाऊस पुढील एक दोन दिवसात पूर्णत: देशातून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यादरम्यान काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणाचा दक्षिणेकडील भाग, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी 30 ते 40 इतक्या वेगानं वारे वाहणार असून मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही भागांवर या सोसाट्याच्या वाऱ्याचा मारा होईल.
मान्सून परतीच्या वाटेवर, तरीही का बरसतायेत जलधारा?
हवामान जाणकारांच्या निरीक्षणानुसार सध्या नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कोमोरीन भागाकडे आहे. ज्यामुळं प्रामुख्यानं लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत आठवड्याच्या अखेरपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ज्या कारणास्तव राज्यातही पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of North Madhya Maharashtra and Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 15, 2025
राज्याच्या काही भागांम्ये पावसाची हजेरी असताना काही जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी गारठा वाढल्याचं स्पष्ट होत आहे. सध्या राज्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये चढ उतार अपेक्षित आहेत. काही ठिकाणी मात्र ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम आहे.
चंद्रपुरात 36.4 अंश सेल्सिअस तापमान
पाऊस माघार घेत असलाना सूर्याचा लख्ख प्रकाश अधिक तीव्र होत असून, त्यामुळं चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जिथं पारा 36.4 अंश सेल्सिअस वर होता. हे तापमान सरासरीपेक्षा 3.4 अंशांनी जास्त असल्याचं सांगण्यात आलं. त्यामागोमाग रत्नागिरी 35.6 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ 34.9, डहाणू 33.2 अंश सेल्सिअस, अकोला 34.6 अंश सेल्सिअस, अमरावती 34.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.