पहा नियमावली ; पुण्यात विवाह समारंभांसाठी नव्याने आदेश जाहीर,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ८ सप्टेंबर -पुण्यात जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात विवाह समारंभांसाठी नव्याने आदेश जाहीर केले आहेत. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘मिशन बिगेन अगेन’चा भाग म्हणून जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगानेच नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत.

विवाह समारंभांसाठीचे हे नवे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जाहीर केले आहेत. यामध्ये नागरीकांनी आणि मंगल कार्यालयांच्या मालकांनी कार्यक्रमस्थळी फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमावलीचे कडक अंमलबजावणी होत आहे की नाही याची खात्री करावी असं म्हटलं आहे. तसंच ५० पेक्षा अधिक पाहुण्यांना विवाह समारंभांला हजेरी लावता येणार नाही, यामध्ये स्वयंपाकी, वेटर्स आणि सांगितिक कार्यक्रम करणारे कलाकार यांचाही समावेश आहे.
त्याचबरोबर विवाह समारंभाच्या आयोजकांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रिकरण करुन पुढील पाच दिवसांत ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे. त्याचबरोबर आयोजकांना कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्यांची यादीही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनुसार बंधनकारक आहे.

“पोलीस पाटील, ग्राम सेवक, तलाठी आणि पोलिसांनी भरारी पथकं नेमून कार्यक्रमस्थळी भेट देऊन संबंधित ठिकाणी नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खात्री करावी. जर नियमांचे पालन केले गेले नसेल तर या भरारी पथकाने पोलिसांत तक्रार दाखल करावी.” असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी जाहीर केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसारच्या या नव्या आदेशात म्हटले आहे. अशी आहे नवी नियमावली

१) जास्तीत जास्त ५० लोकांनाच लग्न समारंभांना हजेरी लावता येईल. या लोकांना एकमेकांमध्ये ६ फुटांचं अंतर राखणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर फिजिकल डिस्टंसिंगचं योग्य प्रकारे पालन होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्याचं काम दोन व्यक्तींवर सोपवण्यात यावं.
२) ५० लोकांची यादी (फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, सांगितिक कार्यक्रम करणारे कलाकार, निवेदक यांच्यासह) स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे, त्याचबरोबर सर्व निमंत्रक (भटजी, वाजंत्री, वेटर्स) यांनी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे.
३) कार्यक्रमस्थळी मद्य सेवन आणि गुटखा, पान मसाला खाण्यास परवानगी नाही. हे पदार्थ खाऊन कार्यक्रमस्थळी थुंकल्यास दंडनीय गुन्हा असेल.
४) वातानुकुलीत व्यवस्था कार्यक्रमस्थळी वापरता येणार नाही.
५) कार्यक्रमातील खुर्च्या, टेबल, किचन, जेवणाची जागा, वॉशरुम्स हे सातत्याने निर्जंतुक करण्यात यावेत.
६) जर कार्यक्रमस्थळी नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास लग्नाचा हॉल, लॉन्स किंवा इतर जागा जिथे कार्यक्रमाचे आयोजन केले असेल तो तात्काळ बंद करण्यात येईल.
७) लग्न समारंभाचे चित्रिकरण करण्यात आलेली सीडी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रमानंतर पाच दिवसांच्या आत जमा करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *