महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ ऑक्टोबर २०२५ |राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा ऑक्टोबरचा हफ्ता पुढील आठवड्यात खात्यात जमा होणार आहे. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे — ई-केवायसी प्रक्रिया तूर्तास थांबवण्यात आली आहे!या निर्णयामुळे लाखो लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला सत्ता मिळवून दिली. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीत या बहिणींची नाराजी सरकारला परवडणारी नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
जून २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत दरमहा ₹१५०० रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होतात. जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेत राज्यभरातील तब्बल २ कोटी ५६ लाख महिलांनी अर्ज केले होते.पडताळणीच्या टप्प्यात मात्र सुमारे ४५ लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. सरकारने आता ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थींचे उत्पन्न तपासण्याचा निर्णय घेतला आहे. वार्षिक उत्पन्न ₹२ लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या कुटुंबातील महिलांचा लाभ थांबविण्याची तयारी सुरू आहे. अंदाजे ७० लाखांहून अधिक महिला अपात्र ठरू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मात्र पात्र महिलांचा लाभ सुरूच राहणार असल्याने त्यांना काळजी करण्याचे कारण नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ई-केवायसीसाठीच्या तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असल्या तरी, ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करायची याची अंतिम मुदत सरकारकडून जाहीर झालेली नाही.