![]()
महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ ऑक्टोबर २०२५ | दिवाळीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा धडाका ! ‘ऑक्टोबर हीट’चा उकाडा कायम असतानाच आता पावसाने थेट हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागांत आज विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान खात्याने आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे —
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि उकाड्याचा तडाखा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
काल मुंबई, कोकण, यवतमाळ, वाशीम आणि नंदुरबार भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे उन्हाची झळ काहीशी कमी झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे.राज्यातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले असून, पहाटे गारवा जाणवू लागला आहे.
ऐन दिवाळीत असा अनियमित पाऊस आणि उकाडा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाची उघडीप कायम राहील, असा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
