महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – बिचिंग – दि. ८ सप्टेंबर – चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एक खुलासा केला आहे. कोरोना उद्रेकाबाबत चीनची भूमी खुली आणि पारदर्शक आहे. तसेच सध्याच्या महामारीच्या काळात जगभरातील लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत, असा दावा झी जिनपिंग यांनी केला आहे.
कोरोनाशी लढा देणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना संकटातून सावरत चीनची अर्थव्यवस्था रुळावर आली आहे. अशी कामगिरी करणारी चीन ही पहिली अर्थव्यवस्था आहे. यावरुन चीनकडे मोठी क्षमता असल्याचे सिद्ध होते, असा दावा देखील जिनपिंग यांनी केला आहे.कोरोनावर आम्ही प्राथमिक टप्प्यात मात करुन यश मिळवले. अर्थव्यवस्थेतही आम्ही आघाडी घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले.
चीनमधील वुहान शहरातून आलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगातील आतापर्यंत २ कोटी ७४ लाखांहून अधिक लोक कोरोनाने बाधित झाले आहेत. तर ८ लाख ९६ हजार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.