![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ ऑक्टोबर २०२५ | महाराष्ट्रात यंदा मान्सूनने परतीचा प्रवास केला असला, तरी पावसाचा जोर कायम आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील वाढते समुद्र पृष्ठभागाचे तापमान आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान राज्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
या हवामान बदलांमुळे मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
मराठवाडा आणि कोकणात जोरदार सरी
सध्याचे हवामान राज्यासाठी प्रतिकूल आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत 23 आणि 24 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस झाला, तर छत्रपती संभाजीनगरात 27 ऑक्टोबरदरम्यान पावसाचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेचे वैज्ञानिक डॉ. सुदीप कुमार यांनी याबद्दल माहिती दिली आहे.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिमझिम पावसाने भात पिकाचे नुकसान केले आहे. समुद्रात वादळी परिस्थितीमुळे मासेमारी ठप्प झाली असून, मच्छीमारांच्या बोटी देवगड बंदरात आश्रयाला आहेत.
जिल्हावार पावसाचा अंदाज
हवामान विभागानुसार, 26 ऑक्टोबरला मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरात पाऊस पडेल. 27 ऑक्टोबरला याच जिल्ह्यांसह धुळे आणि नंदुरबारात पावसाची शक्यता आहे, तर 28 ऑक्टोबरला पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि नांदेडमध्ये पाऊस पडेल. या काळात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे.
चक्रीवादळाचा धोका
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र 27 ऑक्टोबरला चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवेल. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढवेल.
शेतकरी चिंतेत
सततच्या पावसामुळे भात कापणी ठप्प झाली असून, कापलेले पीक भिजून नुकसान होत आहे. हवामान तज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले की, नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसाचा जोर कमी होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन आहे.
