Kartiki Ekadashi Vari : विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी! कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त विठ्ठल-रखुमाई मंदिर २४ तास खुले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ ऑक्टोबर | दरवर्षी कार्तिकी यात्रेला होणारी भाविकांची विक्रमी गर्दी विचारात घेऊन, यंदा यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा पलंग काढण्यात आला आहे. त्यामुळे आता भाविकांना चोवीस तास दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

यावर्षी रविवार (दि. २६ ऑक्टोबर) रोजी शुभ दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. पलंग काढल्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली. आता ९ नोव्हेंबरपर्यंत (प्रक्षाळपूजा) भाविकांना सलग २४ तास दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

राजोपचारात बदल
श्रींचा पलंग काढल्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती यांसारखे राजोपचार बंद राहणार आहेत. या काळात केवळ नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील.

जलद दर्शनाचे नियोजन
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, दर्शन रांगेत मोठ्या संख्येने असलेल्या भाविकांचे लवकरात लवकर आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे पंरपरेनुसार २४ तास मुखदर्शन आणि २२.१५ तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध होत आहे. तसेच, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून आणि जागोजागी लावलेल्या एलईडी टीव्हीद्वारे लाईव्ह दर्शनही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यात्रेतील महत्त्वाचे निर्णय
संपूर्ण यात्रा काळात भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पुजा आणि व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पुजा, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला आणि प्रक्षाळपूजा यांसारख्या मंदिराशी संबंधित सर्व प्रथा-परंपरांचे काटेकोरपणे पालन करण्याचे योग्य नियोजन करण्यात आल्याचे शेळके यांनी नमूद केले.

नियोजनावर विशेष लक्ष
मागील आषाढी यात्रेतील गर्दीचा अनुभव लक्षात घेऊन यंदा कार्तिकी यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद दर्शनाची सुविधा मिळावी यासाठी प्रशासन विशेष लक्ष देऊन प्रयत्न करत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी स्पष्ट केले. श्रींचा पलंग काढण्याच्या पूजेवेळी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी आणि पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *