सीमेवर कधीही काहीही घडू शकतं!” — राजनाथ सिंहांचा इशारा ऑपरेशन ‘सिंदूर’चा उल्लेख करत संरक्षणमंत्र्यांचे ठळक विधान; भारत कायम सज्ज!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ ऑक्टोबर २०२५ | “आपल्या सीमेवर कधीही काहीही घडू शकतं!” — असं ठामपणे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाने नेहमीच युद्धासारख्या परिस्थितीसाठी तयार राहायला हवं, असं स्पष्ट केलं आहे. मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या संघर्षाचा संदर्भ देत त्यांनी *‘ऑपरेशन सिंदूर’*चा उल्लेख केला आणि ती घटना “राष्ट्रीय सुरक्षेच्या तयारीचं आरसपानी उदाहरण” असल्याचं म्हटलं.

सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले —“ऑपरेशन सिंदूर ही एक केस स्टडी आहे. यातून आपण भविष्यासाठी शिकण्यासारखं खूप काही आहे. या घटनेने दाखवून दिलं की आपल्या सीमेवर कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं.”

सिंह पुढे म्हणाले —
“आपल्या सैन्याने त्या परिस्थितीला कठोर प्रत्युत्तर दिलं. मात्र आत्मपरीक्षण आणि सज्जता कायम ठेवणं तितकंच आवश्यक आहे.”

त्यांनी सांगितलं की ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताच्या स्वदेशी शस्त्रसामग्रीची ताकद जगाने पाहिली —आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रह्मोस, आकाशतीर नियंत्रण प्रणाली आणि स्वदेशी विकसित इतर शस्त्रसाधनांनी भारतीय सेनादलाने आपली तयारी सिद्ध केली.

राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरण आणि निर्यातवाढ यावरही भर दिला. २०१४ मध्ये ४६ हजार कोटींचं असलेलं भारताचं संरक्षण उत्पादन आता १.५१ लाख कोटींवर गेलं आहे. त्यात खाजगी क्षेत्राचा वाटा ३३ हजार कोटींचा आहे.तर, संरक्षण निर्यात एका दशकात १,००० कोटींपेक्षा कमीवरून आता २४,००० कोटींवर पोहोचली असून, मार्च २०२६ पर्यंत ती ३०,००० कोटींचा आकडा गाठेल, असं त्यांनी सांगितलं.

🔶 ऑपरेशन ‘सिंदूर’ म्हणजे काय?
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननं प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने तो यशस्वीपणे परतवून लावला — आणि हाच होता “ऑपरेशन सिंदूर”!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *