नाशिक कुंभमेळा २०२७ : तब्बल २५ हजार कोटींचा महाकुंभ ? गतवेळेपेक्षा ‘दहा पट’ खर्च…

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० ऑक्टोबर २०२५ | नाशिक–त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा म्हणजे श्रद्धेचं, भक्तीचं आणि परंपरेचं पर्व — पण या वेळी भक्तीपेक्षा बजेटचाच जल्लोष दिसतोय! येणाऱ्या २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल २५ हजार ५५ कोटींचा विक्रमी विकास आराखडा तयार करण्यात आला असून, आतापर्यंत राज्य सरकारनेच ७ हजार ४१० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

२०१५ च्या कुंभमेळ्यात जिथे एकूण खर्च सुमारे अडीच हजार कोटींवर होता, तिथे यंदा आकडा दहा पट उंचावला! हा कुंभ ‘आध्यात्मिक’पेक्षा ‘भव्य आर्थिक’ वाटेल असा झाला, अशी लोकांमधील कुजबुज सुरू आहे.

कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली. केवळ २१ महिने शिल्लक असताना नाशिक–त्र्यंबकेश्वर परिसरात विकासाची धडधड सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पायाभूत सुविधांपासून ते घाटांपर्यंत सर्वच कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.

राज्य आणि केंद्र सरकारकडून निधीचा वर्षावच झाला आहे —
केंद्र सरकार : महामार्ग, रेल्वे स्थानक, रामकाल पथ, ओझर विमानतळ विकासासाठी ९,४२४ कोटी
राज्य शासन : रस्ते विकासासाठी २,२७० कोटी

नाशिक–त्र्यंबकेश्वर विकास प्राधिकरण : पहिल्या टप्प्यात ५,१४० कोटींची कामे
महानगरपालिकेच्या हाती ३,०१६ कोटी २० लाख, जलसंपदा विभागाकडे ७५० कोटी ५४ लाख, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला १६५ कोटी ८८ लाख, वीज वितरणासाठी ७३ कोटी ५० लाख, राज्य पुरातत्व विभागासाठी ४८ कोटी ७८ लाख, आणि साधूग्राम भू संपादनासाठी तब्बल १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर.

इतकंच नव्हे, तर कुंभाशी निगडित इतर प्रकल्पांसाठी अजून ८,२६३ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. एकूण मिळून — भक्तीपेक्षा भव्यतेचा महाकुंभ!

२०१५ मधील साधारण कुंभात नाशिक महापालिकेने १०५२ कोटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ६६० कोटींची कामे केली होती. मात्र २०२७ मध्ये आकडे पाहता लोक विचारतात — 👉 “हा कुंभ श्रद्धेचा की खर्चाचा?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *