![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० ऑक्टोबर २०२५ | राज्यात निवडणुकीचा माहोल तापू लागलाय — आणि त्याआधीच ‘लाडक्या बहिणींच्या’ खात्यात पुन्हा एकदा सरकारचा हप्ता जमा होणार आहे! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता १५ नोव्हेंबरपूर्वी लागण्याची शक्यता व्यक्त होत असताना, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा विचार सुरू आहे.
राज्यभरातील सुमारे दोन कोटी महिलांना याचा लाभ मिळणार असून, योजनेचा हप्ता पुन्हा राजकीय केंद्रस्थानी आलाय. सूत्रांच्या मते, निर्णय याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या या योजनेने महायुतीला ‘गेमचेंजर’ ठरवले. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या लाभांनंतर सरकारने महिलांना दरमहा ₹१५०० देण्याची घोषणा केली, तर प्रचारात ₹२१०० देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं.आता मात्र निवडणुकांची चाहूल लागताच हप्ता वितरण पुन्हा वेग घेत आहे — आणि विरोधकांचं म्हणणं आहे की, “हा हप्ता भावनिक नव्हे, तर राजकीय गुंतवणूक आहे.”
आगामी काळात ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या, २८९ नगरपालिका आणि २९ महापालिका यांच्यासह राज्यात स्थानिक निवडणुकांचा महासंग्राम रंगणार आहे. त्यातही महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे सरकारने ‘लाडक्या बहिणींची नाराजी’ टाळण्यासाठी दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित देण्याची रणनीती आखल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेक लाभार्थींना दिवाळीतही ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळेच यावेळी “दुहेरी हप्ता, दुहेरी आनंद” देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो.
📱 ई-केवायसीची मुदतवाढही संभवते!
लाभार्थींना ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. सध्या १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली असली तरी, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती आणखी वाढवण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
