![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० ऑक्टोबर २०२५ |’मोंथा’ चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तेलंगणा, विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ३०) विदर्भात हलक्या ते जोरदार सरींची शक्यता आहे. ही वादळी प्रणाली आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, विदर्भातून मार्गक्रमण करताना कमी दाब क्षेत्रात रूपांतरित होणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश व तेलंगणात तशी ३५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळामुळे हवामानात बदल होत आहेत. यामुळे विदर्भासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आलाय. ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुरुवारी विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर पालघर, नंदूरबार, धुळे, नाशिक, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्येही वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात इतरत्रही ढगाळ वातावरण राहील, तसंच काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुण्यातील काही भागात बुधवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी आकाश निरभ्र होते. मात्र, बारा वाजता ढगाळ वातावरण झाले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शिवाजीनगर आणि लक्ष्मी रस्ता परिसरात पावसाने बुधवारी हजेरी लावली. मात्र, शहराच्या इतर भागांत पाऊस झाला नाही. शिवाजीनगरमध्ये ६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तळेगावमध्ये ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
