गंभीर स्थिती ; पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा, मोठे संकट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ९ सप्टेंबर – ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या घरात गेली आहे. अशातच ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्यानं अेनक रुग्णांवर जीव गमवण्याची वेळ येत आहे.पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याची जाहीर कबुली दिली आहे. पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होत आहे. पुण्यातील परिस्थिती ही हाताबाहेर जात असतानाच ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत ही धक्कादायक बाब समोर आली. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण दगावले आहेत आणि हवा तितका पुरवठा उपलब्ध होईपर्यंत अनेक रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येणार आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता किमान 400 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणं गरजेचं असल्याचं लक्षात आलं आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाकडून जी आकडेवारी प्राप्त झाली आहे, ती खरोखरच पुण्याची चिंता वाढवणारी आहे. जम्बो हॉस्पिटल असो की इतर हॉस्पिटल्स असो रुग्णांच्या नातेवाईकांकडून मुख्य तक्रार केली जाते ती रुग्णांना ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर नसल्याची. त्याचाच परिणाम म्हणून की काय जम्बो हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि नर्सनी सामूहिक राजीनामे दिले. पण फक्त डॉक्टर आणि नर्स असून उपयोग नाही तर आत्ताच्या घडीला पुण्यात मोठ्या संख्येने ऑक्सिजन उपलब्ध होणं गरजेचं आहे. अपुऱ्या सुविधा आणि औषधांची कमतरता यात आता ऑक्सिजनच्या तुटवड्याची भर पडली आहे.

राज्यात सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. पुण्यातील 3 हजार 800 जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ऑक्‍सिजन उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्‍सिजन वैद्यकीय उपचारासाठी आणि 20 टक्के ऑक्‍सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्‍सिजन उत्पादक, ऑक्‍सिजन सिलिंडर उत्पादक आणि पुरवठादारांसोबत बैठक घेण्यात आली. या वेळी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधितांना सूचना दिल्या. डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांकडून ऑक्‍सिजनची मागणी वाढत आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात व वेळेत ऑक्‍सिजनचा पुरवठा करावा असही त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *