राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय नाहीच; तुर्तास शाळा सुरु होणार नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. १० सप्टेंबर – मुलांची सुरक्षितता व आरोग्याची खबरदारी घेऊन 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून त्यासंदर्भात काहीच आदेश काढले नसल्याने तुर्तास शाळा सुरु होणार नाहीत.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढत चाललेली संख्या . दुसरीकडे मृतांची संख्या 25 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मृत्यू व कोरोना रुग्णसंख्येत अव्वल राहिला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, अकोला, परभणी व हिंगोली वगळता अन्य जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मुंबई, नाशिक, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली व सांगली मिरज कुपवाड या महापालिका क्षेत्रातील मृतांची संख्या चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्णयावर ठाकरे सरकारने सावध पवित्रा घेत अद्याप शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तत्पूर्वी, शाळा व्यवस्थापन समिती व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेतल्यानंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे.

सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांकडून होईल निर्णयाची घोषणा

राज्यात दररोज सरासरी 20 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहेत. तर दररोज 360 ते 380 मृत्यू होऊ लागले आहेत. कुटुंबातील एका व्यक्‍तीच्या संपर्कातून बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरील भार आणि चिंताजनक बनलेली रुग्ण व मृतांची संख्या पाहता तुर्तास शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने लांबणीवर टाकला आहे. या संदर्भात राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांमधील किती गावांमध्ये रुग्णसंख्या कमी झालेली आहे, किती गावांमध्ये कोरोना पोहचलेला नाही, याची माहिती मागविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानुसार मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक घेऊन सप्टेंबरनंतर अधिकृत घोषणा करतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *