महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १० सप्टेंबर – सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर आज गुरुवारी पट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना सुखद धक्का दिला. आज कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली. आज पेट्रोल ९ पैसे तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले. दर कपातीमुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.६४ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव प्रती लीटर ७९.५७ रुपये झाले आहे. त्यात १२ पैशांची घट झाली.
दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.९९ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.०५ रुपये झाला असून त्यात बुधवारच्या तुलनेत ११ पैसे घट झाली. चेन्नईत पेट्रोल ८ पैशांनी स्वस्त झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा आजचा भाव ८४.९६ रुपये असून डिझेल ७८.३८ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.४९ रुपये आहे. डिझेल ७६.५५ रुपये प्रती लीटर झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८ पैसे आणि डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले.
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते.
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित केला जातो. मागील दोन महिने कधी पेट्रोल तर कधी डिझेल दरात कपात केली जात होती. आज बऱ्याच दिवसांनी दोन्ही इंधनाच्या किमतीत कंपन्यांनी कपात केली आहे.