महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. ११ सप्टेंबर -पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केलेल्या आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडरचा साठा बुधवारी मध्यरात्री १ वाजता संपुष्टात आला. सिलेंडरचा पुरवठा तात्काळ होणे आवश्यक असताना अनेक अडचणींना हॉस्पिटल प्रशासनाला सामोरे जावे लागले. मात्र, आमदार अण्णा बनसोडे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सतर्कता दाखवत मध्यरात्री सूत्रे फिरवत हॉस्पिटलला तात्काळ ऑक्सिजन पुरविला. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाबरोबर 60 ते 70 रुग्णांनाही दिलासा मिळाला.
याबाबत स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केले आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये 95 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या दररोज कमीत कमी 110 ते 120 इतक्या ऑक्सिजन सिलेंडरची गरज असते.
बुधवारी मध्यरात्री हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडरचा साठा संपुष्टात आला. सिलेंडरचा पुरवठा तात्काळ होणे आवश्यक असताना अनेक अडचणींना हॉस्पिटल प्रशासनाला सामोरे जावे लागले. रात्री एकच्या सुमारास तातडीने सिलेंडर मिळणे अशक्य होते. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने आम्ही थेट त्यांचे घर गाठले. कारण प्रश्न रुग्णांच्या जीव वाचाविण्याचा होता.