![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक २ डिसेंबर २०२५ | पुणे विमानतळावर सोमवारी मध्यरात्रीनंतर जे काही घडलं, ते पाहून प्रवाशांच्या सहनशीलतेलाही मर्यादा असतात हे पुन्हा सिद्ध झालं. नागपूरच्या फ्लाइटचं बोर्डिंग दाखवलं एकीकडे, आणि प्रवाशांना फिरवलं मात्र दुसरीकडे—अगदी ‘बसण्यासाठी जागा नाही’पासून ‘पायलट जयपूरमधून येतोय’पर्यंत प्रत्येक कारणानं इंडिगोचा नियोजनशून्य कारभार निर्वस्त्र उभा ठाकला. गेट नंबर ९ समोर उभे असलेले शेकडो प्रवासी दोन तास अक्षरशः ताटकळत उभे. ना माहिती, ना व्यवस्था, आणि ना जबाबदार अधिकारी—जणू काही जनता नाही, तर प्रयोगशाळेतील नमुने.
ज्येष्ठ नागरिक, गरोदर मातांना जमिनीवर बसावं लागलं, रिफ्रेशमेंटपासून साध्या मदतीपर्यंत काहीही नाही. एवढे संकट वाढूनही इंडिगोकडून एकही वरिष्ठ अधिकारी पुढे आला नाही—प्रवाशांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर एकच उत्तर, “पायलट येईल तेव्हा फ्लाइट निघेल!” विमानतळ प्राधिकरणानेही परिस्थितीकडे ‘आम्ही नाही, तुम्ही बघा’ अशाच अविर्भावात पाहिल्यासारखे वाटले.
शेवटी पोलिसांना बोलावून प्रवाशांना शांत करण्यात आलं आणि पहाटे दोनच्या सुमारास गेट उघडलं. पण प्रवाशांच्या मनातला प्रश्न उरतोच—ही विमानतळ व्यवस्था आहे की ‘गोंधळाचा महापूर’? मध्यरात्रीचा हा प्रसंग जणू पुन्हा एकदा सांगून जातो—आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा केवळ पाटीवर असतो, सेवेत अजूनही ‘बोर्डिंग गेट बंदच!’
