महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ सप्टेंबर – मुंबई :राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळावर जोडपत्र ए, बी आणि सीद्वारे ही कार्यप्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह – यांनी राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सना पत्राद्वारे ही कार्यप्रणाली कळवली आहे. कोरोना रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शासनाने निश्चित केलेल्या नियमास अनुसरुन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे. पर्यटन संचालनालयामार्फत त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे विविध हॉटेल असोसिएशन्स, व्यावसायिक यांच्याबरोबर वेबिनारचे आयोजन करुन कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.
मिशन बिगीन अगेनअंतर्गत शासनाने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचा अंतर्भाव पर्यटन संचालनालयाने जारी केलेल्या एसओपीमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, डब्ल्युएचओ, यूएनडब्ल्युटीओ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेनुसार ही एसओपी तयार करण्यात आली आहे.