![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ६ डिसेंबर २०२५ | देशातील सर्वांत मोठी विमान सेवा देणाऱ्या इंडिगोच्या उड्डाण वेळापत्रकात गेल्या चार दिवसांपासून भीषण गोंधळ निर्माण झाला आहे. वैमानिकांची टंचाई, चेक-इन प्रणालीतील तांत्रिक अडथळे आणि संचालनातील त्रुटी यामुळे संपूर्ण हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. पुणे विमानतळावर परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून आजही तब्बल 42 उड्डाणे रद्द झाली आहेत. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर झाला असून, इतर कंपन्यांनी भाड्यांमध्ये अक्षरशः आभाळाला भिडलेली वाढ केली आहे. मुंबई–पुणे विमानाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपये ओलांडल्याने प्रवाशांना जबर फटका बसला आहे.
इंडिगोव्यतिरिक्त इतर विमान कंपन्यांनी वाढलेल्या मागणीचा फायदा घेत पुणे–मुंबई, मुंबई–नागपूर, नागपूर–पुणे या लोकप्रिय मार्गांवर ३० हजारांपेक्षा अधिक भाडे आकारले आहे. नागपूर विमानतळावरही दररोज ७–८ उड्डाणे रद्द होत असून, प्रवासी पूर्णपणे अडकून पडले आहेत. एका प्रवाशाच्या म्हणण्यानुसार मुंबई–नागपूर प्रवासासाठी तब्बल ३९ हजार रुपये आकारले जात आहेत. अनेकांची तिकीटे रद्द झाली असून, काही प्रवाशांना उड्डाणांचे वेळापत्रक दिवसात तीन-तीन वेळा बदलल्यानं प्रचंड गोंधळ सहन करावा लागला.

संकटाचा सर्वात मोठा फटका मात्र राजधानीत बसला. Delhi International Airport Limited ने ५ डिसेंबर रोजी रात्री ११:५९ पर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द असल्याची घोषणा केल्यानंतर हजारो प्रवासी विमानतळावरच अडकले. काहींना तर रात्रभर प्रस्थान कक्षातच थांबावे लागले. मुंबईमध्येही परिस्थिती गंभीर असून गुरुवारी रात्री मुंबई–नागपूर उड्डाण रद्द झाल्याने अनेक व्हीआयपी प्रवाशांनाही विमानतळावरच रात्र काढावी लागली. सामान्य प्रवाशांच्या खिशाला बसलेला आर्थिक फटका आणि मानसिक ताण प्रचंड वाढला आहे.
दरम्यान, या गोंधळाने अनेकांच्या खासगी कार्यक्रमांवरही पाणी फेरले. कर्नाटकातील हुबळीची मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वरचे संगम दास हे दोघेही बंगळुरूमध्ये काम करतात. स्वतःच्या रिसेप्शनला हजेरी लावण्यासाठी त्यांनी ३ डिसेंबरची तिकीटे बुक केली होती. मात्र उड्डाण रद्द झाल्याने त्यांना अखेर ऑनलाइनच स्वतःच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्याची वेळ आली. इंडिगोनं चार दिवसांत तब्बल १००० हून अधिक उड्डाणे रद्द केल्यानं देशभरात हवाई वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांची प्रचंड गैरसोय सुरूच आहे.
