महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ सप्टेंबर – वॉशिंग्टन – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनहून येणार्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण कोरियातील अमेरिकन सैन्याच्या कमांडरनी शुक्रवारी ही माहिती दिली.
उत्तर कोरियातील अशक्त आरोग्य व्यवस्था कोरोना महामारीचा सामना करण्यात निष्प्रभ ठरली आहे. कोरोना संसर्ग पसरल्यापासून आत्तापर्यंत किम जोंग उन यांनी एकही रुग्ण असल्याचे मान्य केलेले नाही. तसेच, कोरोनापासून बचावासाठी चीनशी लागून असलेल्या सीमा जानेवारीतच बंद केल्या होत्या.
यूएस फोर्स कोरियाचे कमांडर रॉबर्ट अब्राम्स यांनी एका ऑनलाईन परिषदेत सांगितले की, सीमा बंद असल्याने तस्करी वाढली आहे. ती रोखण्यासाठी अधिकार्यांना शक्कल लढवावी लागत आहे. उत्तर कोरियाने सीमेला लागून एक-दोन किलोमीटरचा बफर झोन तयार केला आहे. येथे तैनात असलेल्या स्पेशल ऑपरेशन फोर्सला या बफर झोनमध्ये दिसल्यास गोळी घालण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून किम यांची तब्येत उत्तम असून त्यांना कमी लेखता येऊ शकत नाही, असे म्हटले होते.