✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १० डिसेंबर २०२५ | पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (सीडीएफ) असीम मुनीर यांनी पदभार स्वीकारताच जुनीच पद्धत अवलंबली—धमकीची भाषा. इस्लामाबादवर कारवाई करण्याची भाषा करणाऱ्यांना पाकिस्तान ‘जशास तसे’ उत्तर देईल, अशी त्यांची गर्जना. पण नाव न घेता भारतावर टीका करूनही या वक्तव्यातला पोकळपणा लपला नाही. कारण ज्यांच्याकडे स्वतःच्या घरातही नियंत्रण नाही, त्यांच्याकडून ‘प्रत्युत्तर’ देण्याची भाषा म्हणजे किरकोळ जुमला झाला आहे.
जीएचक्यूमधील कार्यक्रमात गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर मुनीर यांनी सांगितले—कोणीही कोणत्याही भ्रमात राहू नये. पाकिस्तान भविष्यात अधिक कठोर, अधिक वेगवान आणि अधिक तीव्र प्रतिसाद देईल. पण प्रत्यक्षात त्याच क्षणी प्रश्न उभा राहतो—पाकिस्तान एखाद्या बाहेरील शक्तीला उत्तर देण्याइतका सक्षम आहे का? आतल्या दहशतवादावर, आर्थिक ढासळणीवर, कर्जाच्या ओझ्यावर नियंत्रण नसताना ‘जशास तसे’ म्हणण्याइतकंच त्यांच्याकडे बाकी काय आहे?
मुनीर यांनी युद्धाच्या नव्या बदलत्या स्वरूपाचा उल्लेख केला—सायबर स्पेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, अंतराळ, सूचना युद्ध, एआय, क्वांटम कम्प्युटिंग… शब्द मोठे, उदाहरणे भारी. पण शस्त्रसज्जतेपेक्षा शाब्दिक सजावट जास्त दिसली. आधुनिक युद्धाच्या या आव्हानांसमोर पाकिस्तानची क्षमता हा स्वतःच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, हे मुनीर यांनीच त्यांच्या वक्तव्यात नकळत कबूल केलं.
सारांश एकच—पदभार स्वीकारताना शक्तीचे प्रदर्शन करणे ही जगभरची परंपरा; पण पाकिस्तानच्या बाबतीत ही परंपरा परत परत ‘पोकळ’ ठरते. मुनीर यांची चेतावणीही त्याला अपवाद नाही. धमकी मोठी, पण शक्ती मात्र धाग्यावर… आणि म्हणूनच ही घोषणा जास्त चमकदार, पण कमी प्रभावी ठरते.
