![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १० डिसेंबर २०२५ | पहिल्यांदा सांगायचं तर, जे संकट आज भारतीय आकाशात घोंगावते आहे, त्याची बीजं बारा वर्षांपूर्वी पेरली गेली होती. पायलट थकवा रोखण्यासाठी तयार केलेले एफडीटीएल नियम लागू करावेत, अशी पायलट संघटनांची मागणी तेव्हाची; पण सरकारी यंत्रणेचा नेहमीचा ढिसाळ वेग, विमान कंपन्यांच्या सोयीसाठी केलेली विलंबनीती आणि डीजीसीएचा वेळोवेळी झालेला ‘डोळेझाक मोड’ — या तिघांनी हातात हात घालून आजची हाहाकारस्थिती निर्माण केली. आणि या गोंधळाच्या केंद्रबिंदूवर आहे इंडिगो. देशातील सर्वाधिक विमाने, सर्वाधिक उड्डाणे, सर्वाधिक पायलट… आणि आता सर्वाधिक डोकेदुखीही!
डीजीसीएने शेवटी कोर्टाच्या धाकाने एफडीटीएल लागू तर केले, पण नियमांमध्ये बदल करतानाच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उड्डाणे वाढवण्याची परवानगी देऊन स्वतःच आग पेटवली. रात्रपाळी, मध्यरात्र उड्डाणे आणि सकाळच्या धावत्या वेळा — इंडिगोचं प्रमुख ऑपरेशनल मॉडेलच या काळावर आधारलेलं. नवीन नियमांनंतर हेच उड्डाण वेळापत्रक धोक्याची घंटा ठरलं. पायलट थकले, विमानतळ गोंधळले आणि प्रवाशांच्या तक्रारींचे ढग दाटू लागले. आता १० फेब्रुवारीपर्यंत ‘सगळं सुरळीत’ करण्याचं आश्वासन इंडिगो देत असली, तरी ही डेडलाईन म्हणजे कागदावरचा किल्ला—भक्कम वाटतो, पण स्पर्श करताच कोसळणारा.
सरकारने अखेर १० टक्के उड्डाण कपातीचा चोप इंडिगोवर मारला. २३०० पैकी १९५० उड्डाणांत आकाशात तरी नियंत्रण मिळेल, अशी अपेक्षा. पण खरी गोष्ट सांगायची तर संकटाचं मूळ उड्डाणसंख्या नाही, तर पायलट्सची कमतरता आहे. १० फेब्रुवारीपर्यंत १५८ आणि पुढील वर्षभरात ७४२ पायलट्सची भरती — ही आकडेवारी वाचायलाच भारी; पण एवढ्या प्रमाणात प्रशिक्षित पायलट्स उपलब्ध कुठे आहेत? उलट एअर इंडिया स्वतः मोठी भरती जाहीर करून उपलब्ध मनुष्यबळ आपल्याकडे खेचत आहे. त्यामुळे इंडिगोचं गणित अधिकच बिघडणार हे स्पष्टच.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिगोचं बिझनेस मॉडेल — कमीत कमी मनुष्यबळ, जास्तीत जास्त उड्डाणे. कॉर्पोरेट जगात हे मॉडेल ‘किफायतशीर यश’ म्हणून टाळ्या मिळवत राहिलं; पण पाठीमागे पायलटचे डोळे लाल होत होते, शिफ्ट्स अवाजवी वाढत होत्या आणि थकव्याची पातळी पार सुरक्षा धोक्यापर्यंत पोचत होती, हे आता समोर आलं आहे. सरकारची कपात आणि डीजीसीएची तात्पुरती सवलत — या दोन्ही गोष्टी इंडिगोला काही काळ श्वास देतील; पण खरी परीक्षा पुढील तीन महिन्यांत होणार. कारण मनुष्यबळ उभं न राहिलं, तर इंडिगोची ‘आकाशातली बादशाही’ जमिनीवर येण्यास वेळ लागणार नाही… आणि तेव्हा पायलट नाही, तर इंडिगोच स्वतःच थकून जाणार!
