महाराष्ट्रात पुढचे 48 तास कडाक्याच्या थंडीचे; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ | हिमालयातून येणाऱ्या शीतलहरींनी महाराष्ट्राला अक्षरशः विळखा घातला असून राज्याच्या बहुतांश भागात तापमान घसरतच आहे. नाशिक, धुळे, नागपूर, जालना या पट्ट्यात तर पारा एकेरी आकड्यावर आल्याने थंडीने लोकांना घरातच ठाण मांडायला भाग पाडलं आहे. हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार पुढील ४८ तास थंडीची लाट अधिक तीव्र होणार असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, नागपूर या जिल्ह्यांसह राज्यातील घाटमाथ्यावर दाट धुक्याची चादर पसरत असून दृश्यमानता घटल्याने वाहतुकीसाठी इशारे देण्यात आले आहेत. उत्तरेकडील शीतलहरी अधिक प्रखर झाल्या आणि त्यातच नव्या पश्चिमी झंझावातानं वेग घेतल्याने महाराष्ट्राकडे येणारे वारे आणखी थंड झाले—त्याचा दाहक परिणाम म्हणजे वाढलेला गारठा.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यांनीही यंदा थंडीचा ‘पेपर’ द्यायला सुरुवात केली आहे. कुलाबा हवामान केंद्रानुसार मुंबईत रात्रीचे तापमान 17–20 अंशांवर घसरले असून सकाळी 11–12 पर्यंत हा गारवा कायम टिकतोय. संध्याकाळी पुन्हा थंड वाऱ्यांचे झोत शहरभर फिरत असल्याने “मुंबईत थंडी नसते” हा नियमही यंदा मोडीत निघालाय. राज्यातल्या तापमानाची घसरण पाहता पुढील दोन दिवस ‘हाडं गोठवणाऱ्या’ थंडीचेच ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *