✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ | आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला तयार झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपूर महापालिकांमध्ये भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी वेगवेगळ्या पद्धतीने मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद जवळपास समान असल्याने कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि अंतर्गत बंडाळी टळावी यासाठी हा वेगळा फॉर्म्युला आखल्याचे समोर आले आहे. नागपुरात भाजपाची ताकद अधिक असूनही मित्रपक्ष शिवसेनेलाही सोबत घेतले जाणार आहे. नवी मुंबईमध्ये मात्र अजून अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, भाजपाकडून उमेदवार निवड आणि रणनीतीसाठी नवा पॅटर्न आणण्याची तयारी सुरू आहे. १००% विजयाची खात्री असलेल्या प्रभागांत तरुण आणि एकनिष्ठ उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. जिथे विजयाबाबत खात्री नाही, तिथे बाहेरील लोकप्रिय व्यक्तींनाही संधी देण्याचा विचार आहे. तसेच युती कायम ठेवण्यासाठी मित्रपक्षांविरोधात प्रतिक्रिया देऊ नयेत, अशा सुचनाही देण्यात येणार आहेत.
