![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा वेग थांबत नाही. टॅरिफ धोरणांपासून बेकायदेशीर स्थलांतरितांवरील कारवाईपर्यंत अनेक धडाकेबाज निर्णयांनंतर त्यांनी आता आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ या नव्या व्हिसा कार्यक्रमाच्या माध्यमातून सरळ अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग उघडला आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या या कार्यक्रमानुसार, १० लाख डॉलर्स भरल्यास थेट अमेरिकन नागरिकत्व देण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी स्वतंत्र वेबसाइटही सक्रिय करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात निधी जमा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये या कार्यक्रमाची माहिती दिली. गोल्ड कार्ड व्हिसा हे नागरिकत्व मिळवण्याचे ‘फास्ट ट्रॅक मॉडेल’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या नव्या पावलामुळे जगभरातील श्रीमंत गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेकडे पुन्हा वेधले जाण्याची शक्यता आहे.
