✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ | पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. ‘निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे’ असा महत्त्वपूर्ण निरीक्षण देत विशेष मोक्का न्यायालयाने कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले.
नातवाच्या खूनप्रकरणात बंडू आंदेकरसह पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आरोप ठोठावले असले तरी निवडणूक लढविण्याचा अधिकार कायम असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.
नामांकनपत्र दाखल करणे, कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे आणि आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त देणे यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले. आंदेकर टोळीवरील गुन्हेगारी संघर्षाचा मागील इतिहास गंभीर असला तरी घटनात्मक हक्कांच्या आधारे दोघींना निवडणूक लढविण्यास परवानगी मिळाली आहे.
