पुण्यात वाहतुकीचा गोंधळ वाढत असताना ‘पे अँड पार्क’चा अट्टाहास; मनपाला निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ | पुण्यातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना मनपाकडून राबवली जाणारी ‘पे अँड पार्क’ योजना नागरिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरत आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनाधिकृतरीत्या चालणारे व्यवसाय या समस्यांमुळे पुणेकर प्रचंड त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत ‘पे अँड पार्क’चा अट्टाहास नेमका कोणासाठी केला जात आहे? असा सवाल नागरिक संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

यासंदर्भात पुणे मनपा आयुक्तांना निवेदन देत पे अँड पार्क योजना त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः लक्ष्मी रोडसह शहरातील प्रमुख मार्गांवरील अनाधिकृत पार्किंग, अतिक्रमण आणि फुटपाथवरील व्यावसायिक गोंधळामुळे वाहतूक व्यवस्थापन कोलमडले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शहरातील वाढत्या प्रवासी आणि वाहनभाराचा विचार करता, नागरिकांच्या सोयीपेक्षा महसूल वाढविण्यावर भर दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अनधिकृत व्यवसायांवर आणि अतिक्रमणांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदन देताना पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल नाईक, संपर्कप्रमुख गुरु कोळी आणि संघटक मिलिंद तीकोणे उपस्थित होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “पुणेकरांच्या हालअपेष्टा कमी करणे ही मनपाची पहिली जबाबदारी आहे, आणि ती पार न पाडल्यास आम्ही शांत बसणार नाही.”

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *