Expressway : ५ तासांचा प्रवास अवघ्या ९० मिनिटांत; महाराष्ट्रात नवा महामार्ग, १४ हजार कोटींचा प्रकल्प

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १३ डिसेंबर २०२५ | पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर थेट हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १४,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सध्याचा ५ तासांचा प्रवास अवघ्या ९० मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) सध्या तयार करण्यात येत असून, लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

वाढवण बंदर–समृद्धी महामार्ग जोड प्रकल्प

हा प्रस्तावित जोडमार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मार्गे इगतपुरी येथे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. एकूण ६५ गावे या मार्गात समाविष्ट असणार आहेत.

वाढवण बंदर केवळ पालघर जिल्ह्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या बंदराशी संलग्न पायाभूत सुविधा उभारणीचे काम सुरू असून, हा फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

महामार्गाची वैशिष्ट्ये

एकूण लांबी: अंदाजे १०४–१०५ किमी
लेन: ३+३ म्हणजेच सहा लेन
प्रस्तावित रुंदी: महामार्ग – १०० मीटर, बोगदे – ८० मीटर
वेगमर्यादा: १०० किमी प्रतितास
अंदाजे खर्च: १४,००० कोटी रुपये

प्रवासात मोठी बचत
सध्या वाढवण ते समृद्धी महामार्गदरम्यानचे अंतर सुमारे १८३ किमी आहे. नवीन जोडमार्गामुळे हे अंतर १०४ किमीपर्यंत कमी होणार असून ७८ किमीची बचत होईल. परिणामी, सध्याचा पाच तासांचा प्रवास एक ते दीड तासांत पूर्ण होणार आहे.

हा महामार्ग महाराष्ट्राच्या बंदर विकास, उद्योग, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना देणारा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *