![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १४ डिसेंबर २०२५ | पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी किंवा मृत्यू झाल्यास महापालिकेकडून भरपाई दिली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने हा निर्णय अंमलात आणला आहे.
महामेट्रो, पाणीपुरवठा, बीआरटी, विद्युत, ड्रेनेज, स्मार्ट सिटी तसेच मोबाईल कंपन्यांच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कामानंतर योग्यरीत्या दुरुस्ती न झाल्याने खड्डे निर्माण होत असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास तक्रारदाराने आवश्यक पुरावे सादर करावे लागतील. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करून अपघातास जबाबदार घटक निश्चित करणार आहे. ठेकेदार दोषी आढळल्यास भरपाईची रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.
भरपाईबाबत स्पष्ट नियम ठरवण्यात आले आहेत. जखमी व्यक्तीस ५० हजार ते २.५ लाख रुपये, तर मृत्यू झाल्यास वारसांना ५ लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. हा निर्णय १३ नोव्हेंबर २०२५ नंतर झालेल्या अपघातांना लागू असून, अर्ज महापालिका भवनातील शहर अभियंता कार्यालयात करावा लागणार आहे.
