✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १४ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांची प्रतीक्षा असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकांची थेट वेळच सांगितली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संघस्थळी आयोजित कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज चव्हाणांच्या भाकितावर टीका करताना त्यांनी काँग्रेसवर खोचक शब्दांत टीका केली आणि अमेरिकेतील घडामोडींचा दाखला देत आरोप फेटाळले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवडणूक सहभागाबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, संघ कधीही थेट निवडणूक प्रचारात सहभागी होत नाही. संघाचे काम हे राष्ट्रनिर्माण, देशभक्ती आणि जनजागृतीपुरते मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका “उद्या-परवा किंवा दोन-तीन दिवसांत जाहीर होतील” असा दावा मुनगंटीवार यांनी केला. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील सर्व २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे, याला या वक्तव्यामुळे दुजोरा मिळतो आहे.
