![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २५ डिसेंबर २०२५ | राज्यात सध्या थंडीचा पारा आणि माणसांचा संयम—दोन्हीही एकाच वेळी खाली-वर होताना दिसत आहेत. “थंडीची लाट ओसरली” असे हवामान विभाग सांगतो, पण सकाळी अंथरुणातून बाहेर पडताना नागरिकांना ते काही पटत नाही. गारठा आहे, हुडहुडी आहे आणि तरीही आकड्यांमध्ये मात्र “किंचित वाढ” दाखवली जाते. ही थंडी नेमकी आहे की नाही, यावरच शंका घ्यावी लागेल, अशी अवस्था आहे.
धुळे, निफाड, परभणी या भागांनी तर थंडीची जबाबदारी अंगावर घेतल्यासारखी परिस्थिती आहे. धुळ्यात ७ अंश, निफाडला ७.३ अंश आणि परभणीत ७.२ अंश तापमान नोंदवले गेले. पुणे, जेऊर, नाशिक, जळगावसारख्या शहरांनीही दहाच्या आत येत “आम्हीही स्पर्धेत आहोत” हे दाखवून दिले. कोल्हापूर, रत्नागिरीसारख्या तुलनेने उबदार भागातही थंडीची चाहूल लागली आहे. थोडक्यात काय, राज्यभर थंडीने आपला हजेरी लावली आहे.
हवामान विभाग म्हणतो—किमान तापमानात थोडी वाढ होईल, पण कमाल तापमानात चढ-उतार सुरू राहतील. म्हणजे सकाळी कडाक्याची थंडी, दुपारी ऊन, संध्याकाळी पुन्हा गार वारा आणि रात्री पुन्हा थरथर—हा सगळा कार्यक्रम रोजचाच झाला आहे. त्यामुळे नागरिक गोंधळले आहेत. स्वेटर काढायचा की घालायचा, हा प्रश्नही आता हवामानाइतकाच गुंतागुंतीचा झाला आहे.
या सगळ्यात परभणीने मात्र थंडीचा इतिहास रचला आहे. तब्बल ३६ वर्षांत पहिल्यांदाच डिसेंबर महिना इतका थंड ठरला. १९८९ पासूनचा डेटा तपासल्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हा निष्कर्ष काढला आहे. पाच, सहा, सात अंशांवर सातत्याने घुटमळणारे तापमान पाहता परभणी जणू काही महाराष्ट्रात नव्हे, तर एखाद्या थंड प्रदेशातच वसले आहे, असा भास होतो.
थंडीची लाट जरी “कागदावर” ओसरली असली, तरी प्रत्यक्षात थंडी अजूनही आपली पकड सोडायला तयार नाही. शेतकरी, कामगार, लहान मुले आणि वृद्धांसाठी हा काळ विशेष काळजीचा आहे. कारण आकडे काहीही सांगोत, सकाळच्या थंड वाऱ्यातून एकच संदेश मिळतो—थंडी अजून गेली नाही!
