![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २५ डिसेंबर २०२५ | नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधीच बँकांनी ग्राहकांना एक प्रकारचा “सुट्टीचा धक्का” दिला आहे. जानेवारी २०२६ मध्ये तब्बल १६ दिवस बँका बंद राहणार असल्याची यादी रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आणि सामान्य माणसाच्या कपाळावर आठी उमटली. कारण पगार, हप्ता, चेक, कर्ज, पासबुक, ड्राफ्ट—हे सगळे कागदावरचे व्यवहार अजूनही अनेकांसाठी “डिजिटल”पेक्षा जास्त जिव्हाळ्याचे आहेत.
आरबीआयची सुट्टीची यादी पाहिली तर असं वाटतं, की जानेवारी महिना हा कामासाठी नाही, तर सुट्ट्यांसाठीच निर्माण झाला आहे. नववर्ष, प्रादेशिक सण, जयंती, उत्सव, शनिवार-रविवार… प्रत्येक कारणासाठी बँक बंद! म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच एक-दोन दिवस, मग लगेच एखादी जयंती, मध्येच शनिवार-रविवार, पुन्हा एखादा सण—असा सुट्ट्यांचा रांगा लावलेला मेळाच जणू.
१ जानेवारीला नववर्ष आणि गान नगाईनिमित्त काही शहरांमध्ये बँका बंद. लगेच २ जानेवारीला मन्नम जयंती, ३ जानेवारीला हजरत अली जयंती, ४ जानेवारी रविवार. आठवड्याची सुरुवातच “बँक बंद”ने होते. त्यानंतर दुसरा शनिवार-रविवार, मग स्वामी विवेकानंद जयंती, मकरसंक्रांत, पोंगल, थिरुवल्लुवर दिवस, उझावर तिरुनल… सुट्ट्यांची यादी पाहिली तर कॅलेंडरपेक्षा पंचांगच उघडल्यासारखं वाटतं.
यात गंमत अशी की, या सगळ्या सुट्ट्या सर्वत्र एकसारख्या नाहीत. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी बँका बंद. म्हणजे मुंबईत बँक सुरू, तर चेन्नईत बंद. कोलकत्त्यात सुट्टी, तर पुण्यात कामकाज सुरू. त्यामुळे “आज बँक उघडी आहे का?” हा प्रश्न आता हवामानाइतका महत्त्वाचा झाला आहे.
अर्थात, बँक कर्मचारीही माणूसच आहेत; त्यांनाही सुट्ट्या हव्यात. पण सामान्य ग्राहकाच्या नजरेतून पाहिलं तर बँक म्हणजे गरजेच्या वेळी धाव घेण्याचं ठिकाण. आणि तिथेच “आज बंद आहे” असा बोर्ड दिसला, की डोक्यातील ताण वाढतो.
म्हणूनच जानेवारीत बँकेत काही महत्त्वाचं काम असेल, तर “उद्या जाऊ” म्हणण्याऐवजी आधी सुट्टीची यादी तपासा. नाहीतर सुट्टी बँकेची असते आणि फटका मात्र ग्राहकालाच बसतो—हे समीकरण अजूनही तसंच आहे!
