✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० डिसेंबर २०२५ | पुणे विमानतळावर सध्या प्रवाशांपेक्षा जास्त काळ थांबणारी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे वाहनांची रांग. कुणी ‘फक्त दोन मिनिटांत येतो’ म्हणत अर्धा तास थांबतो, तर कुणी विमान लँड होण्याआधीच गाडी लावून मोबाईल स्क्रोलिंग सुरू करतो. या सगळ्याचा परिणाम म्हणजे टर्मिनलसमोर कायमची वाहतूक कोंडी. अखेर विमानतळ प्रशासनाने यावर तोडगा काढत ‘१२ मिनिटांचा अल्टिमेटम’ दिला आहे.
आगामी आठवड्यात पुणे विमानतळावर ‘ड्वेल टाइम’ नियम लागू होणार असून, टर्मिनल परिसरात १२ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनचालकांना दंड भरावा लागणार आहे. यासाठी विमानतळ परिसरात अत्याधुनिक ‘एनपीआर’ (नंबर प्लेट रेकग्निशन) कॅमेरे बसविण्यात येत आहेत. एकदा वाहन आत शिरले की, त्याची एन्ट्री-एक्झिट वेळ संगणकात नोंदवली जाणार आहे.
पुणे विमानतळावर दररोज सुमारे १५ हजार वाहनांची वर्दळ, २०० विमानांची हालचाल आणि जवळपास ३५ हजार प्रवासी ये-जा करतात. मात्र, टर्मिनलसमोरील फक्त १० पार्किंग बे आणि मर्यादित जागेमुळे थोडीशीही बेफिकिरी थेट कोंडीत रूपांतरित होते. विशेषतः रात्रीच्या वेळी, प्रवासी, टॅक्सी, खासगी वाहने आणि ‘मी इथेच थांबतो’ मानसिकता यांचा त्रिवेणी संगम होतो.
नव्या नियमानुसार, टर्मिनलमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या नंबर प्लेटवर कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाईल. १२ मिनिटांची मुदत ओलांडली की संबंधित वाहनाची माहिती यंत्रणेकडे जाईल आणि दंड आकारला जाईल. दंडाची रक्कम अद्याप निश्चित नसली, तरी इतर मोठ्या शहरांतील अनुभव पाहता ती ५०० ते १५०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.
पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्या मते, वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी हा नियम आवश्यक आहे. तर एरोमॉलचे उपाध्यक्ष युवराजसिंग रजपूत यांनी स्पष्ट केले की, काही वाहनचालकांच्या निष्काळजीपणाचा फटका थेट प्रवाशांना बसतो, हे थांबवणे गरजेचे होते.
चेन्नई, हैदराबाद, बंगळूरु यांसारख्या विमानतळांवर आधीपासूनच वेळेची मर्यादा लागू असून, पुणेही आता त्या यादीत सामील होत आहे. यामुळे कोंडी कमी होणे, वाहतूक सुरळीत होणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही फायदा होणार आहे.
“पूर्वी विमान उशिरा येत होतं, आता गाडी उशिरा काढली तर दंड येणार… प्रगती यालाच म्हणायची!” 😄
