![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० डिसेंबर २०२५ | मागील काही दिवसांपासून रोज सकाळी नवे उच्चांक गाठणाऱ्या सोने-चांदीने अखेर आज गुंतवणूकदारांना आठवण करून दिली की, “मी दागिना आहे, पण हमखास नाही!” सकाळच्या सत्रात आकाशाला गवसणी घालणारे भाव दिवसअखेरीस जमिनीवर आपटले आणि बाजारात एकच चर्चा सुरू झाली— इतकी मोठी घसरण का?
चांदीच्या बाबतीत तर घसरण थेट नजरेत भरणारी ठरली. रविवारी प्रति किलो २ लाख ५० हजार रुपयांवर पोहोचलेली चांदी अवघ्या २४ तासांत २ लाख २६ हजार रुपयांवर आली. म्हणजेच, चांदीची चमक एका दिवसात २४ हजार रुपयांनी फिकी झाली. दुसरीकडे, सोन्याचाही तोरा कमी झाला. सकाळी प्रति दहा ग्रॅम १ लाख ४० हजार रुपये असलेला भाव घसरत १ लाख ३४ हजार रुपयांपर्यंत आला. दिवसभरात सोन्याच्या भावात चार ते पाच टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारातही चित्र वेगळे नव्हते. सकाळी चांदीने ८३ डॉलर प्रति औंस असा विक्रमी टप्पा गाठला. मात्र, हा उच्चांक गाठताच गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू केली आणि काही तासांतच भाव ७९ डॉलर, तर नंतर ७२.५० डॉलरपर्यंत घसरला. म्हणजे दिवसभरात तब्बल दहा डॉलरची घसरण झाली.
तज्ज्ञांच्या मते, युक्रेन-रशिया संघर्षात शांततेबाबत निर्माण झालेल्या आशावादामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाणारे सोने-चांदीवरील ताण काहीसा कमी झाला. त्याचा थेट परिणाम भावांवर दिसून आला. ‘एमसीएक्स’वर चांदीने सकाळी २ लाख ५४ हजार १७४ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता, पण तो टिकवण्यात ती अपयशी ठरली.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पीएनजी अँड सन्सचे संचालक अमित मोडक म्हणाले की, अलीकडील वेगवान वाढीनंतर दरांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि आज त्याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी उत्साहापेक्षा सावधगिरीला प्राधान्य द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
सरत्या वर्षात मात्र चांदीने सोन्यापेक्षा सरस कामगिरी केली आहे. औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या भावात वर्षभरात तब्बल १८१ टक्क्यांची वाढ झाली आहे. भविष्यातही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता असून, २०२६ मध्ये चांदीचा भाव १०० डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
“सोनं-चांदीचा बाजार म्हणजे लग्नासारखा आहे; वरात मिरवते जरूर, पण खर्चाचा धक्का शेवटी बसतोच!” 😄
