![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १४ फेब्रुवारी २०२६ || पुणेकरांनो, सिग्नलवर उभं राहून आयुष्याचा अर्धा भाग खर्च करण्याची शिक्षा आता कमी होणार अशी चिन्हं दिसत आहेत! Pune महानगरपालिकेने ३२ प्रमुख रस्त्यांसाठी वेगवान आणि दूरदृष्टीपूर्ण आराखडा तयार केला आहे. २७० कि.मी. लांबीच्या या मुख्य मार्गांवर शहरातील तब्बल ८० टक्के वाहतुकीचा भार आहे—म्हणजे पुण्याची नाडीच जणू या रस्त्यांवर धडधडते. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता यांना हेरिटेज धाटणीचा साज चढणार; गणपती चौक ते कुंटे चौक हा टप्पा पूर्णत्वास जाणार. कात्रज-कोंढवा रस्ता तब्बल ५० मीटर रुंद होणार, तर ९ मार्गांसाठी कॉरिडोर इम्प्रूव्हमेंट आणि ३० ठिकाणी जंक्शन इम्प्रूव्हमेंटची शस्त्रक्रिया होणार. म्हणजे कोंडीच्या जखमेवर फक्त फुंकर नाही, थेट टाके बसणार!
रस्ते आहेत २,२७३ कि.मी., पण त्यांची अवस्था पाहून कधी कधी ते ‘रस्ता’ नसून ‘अडथळा शर्यत’ वाटते. यंदा मात्र खड्ड्यांवर मलमपट्टीच नाही तर शिस्तीची पट्टीही बसवली जाणार आहे. १८ हजार खड्डे बुजविले, २ हजार चेंबर समपातळीत आणले—ही केवळ आकडेवारी नाही; हा पुणेकरांच्या संयमाचा हिशेब आहे! १२ ‘मिसिंग लिंक’ ताब्यात घेऊन विकसित केल्या जाणार; नवले पुलाजवळील सेवारस्त्यांना प्राधान्य देऊन अपघातांना आळा घालण्याचा निर्धार आहे. वाकड ते कात्रज राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ते टप्प्याटप्प्याने उभे राहणार. गणेशखिंड रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यात भूसंपादनावर भर; विमानतळ रस्ता सीएसआरमधून पूर्ण करण्याची तयारी. म्हणजे विकासाच्या गाडीला यंदा खरोखरच इंधन मिळालंय!
आता केवळ डांबरीकरण नाही; अर्बन मोबिलिटी सेल, जीआयएस आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे ट्रॅफिक डेटा वापरून नियोजन होणार. ‘रोड मित्र’, ‘युवर ऑफिसर’ आणि ‘ट्रेंचिंग’ ॲपमुळे पारदर्शकतेला चालना मिळणार. येरवड्यात नवीन हॉट मिक्स प्लांट उभा राहणार; मिलिंग-रिसर्फेसिंगला गती दिली जाणार. ७५ कि.मी. रस्त्यांच्या उन्नतीकरणामुळे वाहतुकीचा वेग १० टक्क्यांनी वाढल्याचा दावा आहे—आता तो अनुभवात उतरावा, एवढीच अपेक्षा. पुणेकरांना रोजच्या कोंडीतून सुटका देण्याची ही संधी आहे; आराखडे कागदावरून रस्त्यावर उतरले, तरच या घोषणांना खरा अर्थ येईल. अन्यथा, पुन्हा एकदा पुणेकर सिग्नलवर उभे राहून ‘विकास’चा हिरवा दिवा शोधत बसतील!
