✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० डिसेंबर २०२५ | साखरेचा गोडवा तोंडात कमी आणि खात्यात जास्त हवा—अशी अवस्था सध्या महाराष्ट्रातील साखर उद्योगाची झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना उसापोटी दिले जाणारे बिल वाढत चालले आहे, तर दुसरीकडे साखर विक्रीचा दर मात्र जागेवरच अडकून बसला आहे. या दोन आकड्यांमधील तफावतीमुळे साखर कारखान्यांना प्रति क्विंटल सुमारे ३०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे साखरेचा विक्री दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असा सूर सध्या साखर उद्योगातून उमटत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रीय तसेच राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह ही बैठक होणार असून, साखर दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना पवार यांनी साखर उद्योगासमोरील अडचणी मांडल्या. यावेळी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारने यापूर्वीच १५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. याशिवाय आणखी ५ लाख टन निर्यातीला तत्त्वतः मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता आणखी १० लाख टन साखर निर्यातीस परवानगी मिळावी, अशी ठाम मागणी साखर उद्योगाकडून करण्यात आली आहे.
साखर उद्योगासाठी निर्यात हा केवळ पर्याय नसून गरज बनली आहे. देशांतर्गत बाजारात दर नियंत्रित ठेवताना, उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक कोंडी होत असून, त्याचा फटका अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांनाही बसू शकतो. ही साखळी तुटू नये, यासाठी केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावर उत्तर देताना पवार यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील महासंघांना सोबत घेऊन अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. साखर दर, निर्यात आणि कारखान्यांच्या अडचणी यावर अनुकूल निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“साखर गोड आहे, पण तोटा कडू झाला की सरकारलाही चहात साखर कमीच घालावी लागते!” 😄
