“पुणेकरांनो, नववर्षात गाडी चालेल… पण नंबरप्लेट नसेल तर हजार रुपयांचा धक्का बसेल!”

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० डिसेंबर २०२५ | पुणेकरांची ओळख म्हणजे शिस्त, संस्कृती आणि नियमांची चर्चा—पण प्रत्यक्षात नियम पाळण्याची वेळ आली की, ‘उद्या करू’ हा शब्द हमखास पुढे येतो. हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बाबतीतही नेमकं तेच चित्र पुणे जिल्ह्यात दिसत आहे. शासनाने दिलेली ३१ डिसेंबरची अंतिम मुदत संपत आली, तरीही पुणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वाहनांवर अजूनही एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आलेली नाही.

राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एचएसआरपी बंधनकारक आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भाग, तसेच औद्योगिक परिसरात मिळून लाखो वाहने या श्रेणीत येतात. मात्र, परिवहन विभागाच्या माहितीनुसार, अजूनही लक्षणीय टक्केवारीतील वाहनधारकांनी मुदतीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

यामुळे प्रशासनालाही दिलेल्या वेळेत सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे अवघड असल्याचे मान्य करावे लागत आहे. त्यामुळे एकदा पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता असली, तरी त्यानंतर मात्र नियम मोडणाऱ्यांवर कारवाई अटळ असणार आहे. मुदतवाढीनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनास प्रत्येकवेळी १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

पुण्यात आधीच वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न आणि नियमभंगाची यादी मोठी आहे. त्यात आता एचएसआरपीचा मुद्दा जोडला गेला आहे. वाहतूक पोलिसांच्या मते, एचएसआरपीमुळे चोरीची वाहने ओळखणे, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा माग काढणे आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे अधिक सोपे होणार आहे. मात्र, पुणेकरांच्या दृष्टीने हा नियम सध्या ‘वेळेत केलं तर ठीक, नाहीतर खिशाला फटका’ असा ठरत आहे.

विशेष म्हणजे, फॅन्सी नंबरप्लेट किंवा नावात बदल केलेल्या नंबरप्लेटसाठी दंड वेगळाच आहे. पहिल्यांदा ५०० रुपये, दुसऱ्यांदा १५०० रुपये, तर नंबरप्लेटमध्ये छेडछाड केल्यास पहिल्यांदा १००० आणि दुसऱ्यांदा २००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. वारंवार नियम मोडल्यास कारवाई अधिक कठोर होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

परिवहन विभागाने पुणेकरांना आवाहन केले आहे की, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता एचएसआरपी बसवून घ्यावी, अन्यथा नववर्षाची सुरुवात दंडाच्या पावतीने होऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *