![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३ जानेवारी २०२६ | नवीन वर्ष आलं, पतंग उडाले, तीळगूळ तयार झाला… आणि महाराष्ट्रातील लाखो महिलांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली—“लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला का?” उत्तर नेहमीसारखंच—“आला आहे… येणार आहे… लवकरच येईल.”
नोव्हेंबरचा हप्ता आला. १५०० रुपये खात्यात जमा झाले आणि महिलांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण लगेच पुढचा प्रश्न—डिसेंबरचं काय?
त्यावर उत्तर—“थांबा, चर्चा सुरू आहे.”आता चर्चा म्हणजे शासनाची राष्ट्रीय वेळकाढू योजना. चर्चा असते, तारीख असते, पण खात्यात पैसे नसतात.दरम्यान, नव्या चर्चेने डोके वर काढले—डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार!म्हणजे काय तर—१५०० + १५०० = ३०००!हे ऐकताच महिलांच्या डोळ्यांत मकरसंक्रांतीपूर्वीच गूळ उतरला.१४ जानेवारी, मकरसंक्रांतीचा शुभ मुहूर्त, आणि खात्यात थेट तीन हजार?वाह! सरकारलाही आता मुहूर्त कळायला लागले म्हणायचे!
अर्थात, अजून अधिकृत घोषणा नाही. पण निवडणुका आहेत.महापालिका निवडणुका १४-१५ जानेवारीला.आणि महाराष्ट्रात एक अलिखित नियम आहे—निवडणूक जवळ आली की योजना अचानक “गतिमान” होतात.
म्हणजे महिलांना डबल आनंद—एकीकडे संक्रांत, दुसरीकडे खाते तपासण्याचा उत्सव.आता पतंगापेक्षा जास्त उंच अपेक्षा उडू लागल्या आहेत.
पण प्रत्येक गिफ्टसोबत एक “सूचना” असतेच. या योजनेतही आहे—केवायसी. ज्यांनी केवायसी केली नाही, त्यांचा लाभ बंद. म्हणजे योजना लाडकी असली, तरी बहीण जर कागदपत्रांत थोडी “आळशी” असेल, तर लाडकं सरकारही रुसतं.
लाखो महिलांनी अजून केवायसी केलेली नाही म्हणे.त्यामुळे काहींच्या खात्यात तीन हजार येतील,तर काहींच्या मोबाईलवर फक्त मेसेज येईल—“आपली केवायसी अपूर्ण आहे.”पैसे नाही, पण सूचना मात्र वेळेवर!
एकूण काय,
लाडकी बहीण योजना ही आता केवळ आर्थिक योजना राहिलेली नाही.ती सण, निवडणूक, मुहूर्त आणि अटी-शर्ती यांचा सुंदर संगम बनली आहे.
“योजना लाडकी आहे, पण वेळ मात्र फारच नखरेल आहे. ती कधी येईल, किती येईल, हे सरकारपेक्षा संक्रांतच जास्त ठरवतं!”
