सोन्याचा बुल रन संपला? ५८ हजारांची संभाव्य घसरण; १ लाखाखाली येण्याचा धक्कादायक अंदाज!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १७ फेब्रुवारी २०२६ || 2025 मध्ये गुंतवणूकदारांना सोन्याने चकित केले होते. 2026 च्या सुरुवातीलाही तीच तेजी कायम राहिली आणि Multi Commodity Exchange of India (MCX) वर जानेवारीत सोने प्रति १० ग्रॅम १,८०,७७९ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले. मात्र चित्र अचानक पालटले. विक्रमी पातळीवरून तब्बल २४,५०० रुपयांची (सुमारे १३.५%) घसरण होत दर १,५६,२०० पर्यंत खाली आला. १६ फेब्रुवारीला एमसीएक्सवर सोने १,५४,९३७ रुपयांवर व्यवहार करत होते. तेजीच्या नशेत असलेल्या बाजाराला हा मोठा धक्का मानला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ सुरुवात असू शकते आणि घसरण आणखी खोल जाऊ शकते.

या उलथापालथीमागे रशियाची अमेरिकन डॉलरबाबतची बदलती भूमिका चर्चेत आहे. ‘डी-डॉलरायझेशन’चा झेंडा उंचावणाऱ्या BRICS समूहातील देशांनी गेल्या काही वर्षांत सोन्याची आक्रमक खरेदी केली होती. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांनी डॉलरला पर्याय निर्माण करण्यासाठी सोन्याला व्यापारमाध्यम बनवण्याचा प्रयत्न केला. 2020 ते 2024 दरम्यान जागतिक खरेदीपैकी मोठा हिस्सा या देशांच्या केंद्रीय बँकांकडे गेला. पण जर रशिया पुन्हा डॉलरमध्ये व्यापार वाढवू लागला, तर सोन्यावर आधारित व्यवहाराची संकल्पना कमकुवत होऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मागणी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. तज्ज्ञ अनुज गुप्ता यांच्या मते, Donald Trump यांच्या टॅरिफ धोरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय बँकांनी सोन्याकडे धाव घेतली होती; आता तीच मागणी कमी झाली तर दरांवर मोठा दबाव येऊ शकतो.

PACE 360 चे अमित गोयल यांचा अंदाज आणखी धक्कादायक आहे. त्यांच्या मते, सोन्याने उच्चांक गाठून झाला असून आता घसरणीचा टप्पा तीव्र होऊ शकतो. भारतात दर १० ग्रॅममागे १ लाखांच्या खाली येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर $3,000 प्रति औंसपर्यंत घसरू शकतात. सर्वप्रथम ‘पेपर गोल्ड’मध्ये मोठी विक्री होईल आणि त्यानंतर भौतिक सोन्याचे दर कोसळतील, असा त्यांचा इशारा आहे. सध्या दिसणारी कोणतीही उसळी ही “डेड कॅट बाउंस” ठरू शकते—म्हणजे मोठ्या घसरणीपूर्वीची तात्पुरती वाढ. तेजीच्या शिखरावर उभ्या असलेल्या सोन्याला आता खऱ्या अर्थाने परीक्षेचा काळ सुरू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *