Pimpri Chinchwad: पालिकेच्या दालनात दोन्ही पवारांचे फोटो; पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १७ फेब्रुवारी २०२६ || पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय चर्चांना अचानक उधाण आले आहे. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा रंगत असतानाच पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या दालनात Sharad Pawar आणि दिवंगत Ajit Pawar यांचे फोटो एकत्र झळकल्याने राजकीय संकेत काय, याबाबत कयास बांधले जात आहेत. शहरात विरोधी पक्षनेते पद अजित पवार गटाकडे असताना त्यांच्या दालनात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आल्याने ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी हा निर्णय विलीनीकरणाशी संबंधित नसून “पवार साहेब एक विचार आहेत” या भावनेतून घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

भोईर यांनी असा दावा केला की कार्यकर्त्यांची इच्छा विलीनीकरणाची आहे आणि अजित दादा शेवटच्या क्षणापर्यंत त्यावर चर्चा करायचे. “दादांच्या अंतर्मनातील भूमिका काय होती हे मला ठाऊक नाही; पण भावना मात्र सकारात्मक होती,” असे ते म्हणाले. विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, तसेच Sunil Tatkare आणि Praful Patel घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशीही भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत २६ फेब्रुवारी रोजी कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना पक्षांतर्गत बैठकीत विलीनीकरणावर माध्यमांमध्ये चर्चा करू नये, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे. सध्या पक्ष संघटनाबांधणी, राष्ट्रीय अध्यक्ष निवड आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर भर देण्यात येत आहे. मात्र पिंपरी चिंचवडच्या दालनात लागलेले दोन्ही पवारांचे फोटो केवळ प्रतीकात्मक आहेत की मोठ्या राजकीय बदलाची चाहूल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *