✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ | राजकारण म्हणजे सेवा, असं आपण पुस्तकात वाचलं होतं. प्रत्यक्षात मात्र राजकारण म्हणजे सत्ता, पैसा आणि गरज पडली तर रक्त — हे सोलापूरने पुन्हा एकदा दाखवून दिलं. महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा वाद इतका टोकाला गेला की एका कुटुंबाचा आधार कायमचा हिरावून घेतला गेला. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली आणि त्यांच्या घरात उरला तो फक्त आक्रोश.
त्या घरात अमित ठाकरे गेले तेव्हा कुठलाही राजकीय भाषणाचा मंच नव्हता, कुठलेही झेंडे नव्हते. होते ते फक्त अश्रू. बाळासाहेबांची लहान मुलगी ढसाढसा रडत म्हणत होती — “माझे पप्पा मला सोडून गेले…” ही ओळ ऐकून कुठलाही दगडाचा पुतळाही वितळेल. अमित ठाकरेही गहिवरले. शब्द हरवले, डोळे ओले झाले. त्या क्षणी ते नेते नव्हते, ते फक्त एक माणूस होते.
पण दुर्दैव असं की अशाही क्षणात काही लोकांना संवेदना नाहीत, तर फक्त व्ह्यूज दिसतात. चिमुकलीचा आक्रोश कॅमेऱ्यात कैद केला जात होता. अमित ठाकरे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तात्काळ कॅमेरे बंद करण्यास सांगितले. वेदना हा शो नसतो, हे त्यांनी कृतीतून दाखवलं. तरीही व्हिडिओ बाहेर आला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रश्न असा आहे — दुःखालाही आता परवानगी घ्यावी लागते का?
https://www.facebook.com/watch/?v=1414640566763707
या भेटीनंतर अमित ठाकरे संतापले. आणि तो संताप राजकीय नव्हता, तो मानवी होता. “निवडणुकीसाठी माणसं मारली जात असतील, तर अशा निवडणुका आम्हाला नकोत,” असं ते ठामपणे म्हणाले. पैशाचं आमिष, दबाव, धमक्या — हे सगळं पुरेसं नव्हतं म्हणून आता हत्या? हा लोकशाहीचा उत्सव आहे की गुन्हेगारी स्पर्धा?
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आवाहन केलं — “एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या.” कारण इथे आकडे नाहीत, इथे जाहिराती नाहीत, इथे एक आई आहे, एक पत्नी आहे आणि दोन लहान मुली आहेत, ज्या आज वडिलांच्या अस्थी विसर्जन करून परत आल्या आहेत. प्रश्न साधा आहे — कशासाठी?
बाळासाहेब सरवदे परत येणार नाहीत. पण त्यांच्या मुलीच्या त्या वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमचा डाग उमटवला आहे.राजकारण जिंकलं असेल कदाचित…पण आज माणुसकी हरली आहे.
