✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ | सिडनी क्रिकेट ग्राऊंड! नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येते ती फिरकीपटूंची जादू, चेंडूचा वळसा आणि फलंदाजांचा गोंधळ. पण याच मैदानावर यावेळी एक वेगळाच तमाशा पाहायला मिळाला — ऑस्ट्रेलियाचा संघ एकाही फिरकीपटूशिवाय मैदानात उतरला! तब्बल १३८ वर्षांत पहिल्यांदाच अशी घटना घडली आणि क्रिकेटच्या इतिहासाने भुवया उंचावल्या.
हा निर्णय धक्कादायक आहे की ऐतिहासिक, यावर चर्चा होईलच. पण स्टीव्ह स्मिथने स्वतः कबुली दिली — “हा निर्णय घेताना आनंद झाला नाही.” म्हणजेच हा आनंदाचा नव्हे, तर परिस्थितीचा निर्णय! सिडनीची खेळपट्टी पाहून कर्णधार म्हणाला, “इथे फिरकी टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे.” पूर्वी जिथे फिरकीपटू नंदनवनात नाचायचे, तिथे आज वेगवान गोलंदाजच राजा ठरले आहेत.
१८८८ पासून चालत आलेली परंपरा यावेळी थेट पॅव्हेलियनमध्ये बसवण्यात आली. नॅथन लायन, टॉड मर्फी — सगळ्यांना डच्चू! त्यांच्या जागी अष्टपैलू बो वेबस्टर संघात. म्हणजे फिरकी नाही, पण गरज पडली तर “थोडीफार फिरकी” टाकायला एक माणूस तयार. क्रिकेटमध्ये आता कौशल्यापेक्षा कॅल्क्युलेशन जास्त महत्त्वाचं झालं आहे, असं वाटायला लागतं.
स्मिथचं म्हणणं स्पष्ट आहे — सध्याच्या सपाट खेळपट्ट्यांवर फिरकीपटू म्हणजे धावांचा एटीएम. फलंदाजांनी आक्रमक खेळ केला, तर ३०–४० धावा सहज जातात आणि सामना हातातून निसटतो. “मला फिरकीपटू आवडतात,” असं म्हणत स्मिथने जणू त्यांच्या जखमेवर फुंकर घातली; पण प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र जागा नाही!
ही परिस्थिती फक्त ऑस्ट्रेलियाची नाही. इंग्लंडनेही आपल्या फिरकीपटू शोएब बशीरला संपूर्ण दौऱ्यात बेंचवरच बसवून ठेवलं. बिचारा बशीर — ऑस्ट्रेलिया पाहिला, पण एकही चेंडू टाकला नाही! आकडे सांगतात, मालिकेतील पहिल्या चार कसोटींमध्ये फिरकीपटूंना फक्त नऊ बळी. म्हणजे फिरकीला फक्त विकेट नाही, तर विश्वासही मिळत नाही.
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने आपली ‘ऑलराउंडर’ भूमिका बजावली. इंग्लंड २११/३ वर असताना खेळ थांबला. रूट आणि ब्रुकची भागीदारी रंगात आली होती. पण सिडनीत यावेळी खरी चर्चा धावांची नाही, तर फिरकीच्या अनुपस्थितीची आहे.
प्रश्न असा आहे —
ही खेळपट्टी फिरकीविरुद्ध आहे की काळ बदलतोय?आणि उद्या क्रिकेटमध्ये फिरकीपटू इतिहासजमा तर होणार नाहीत ना?सिडनीत फिरकीला सुट्टी मिळाली आहे…पण क्रिकेटप्रेमींच्या मनात प्रश्न कायमचा बसला आहे.
