![]()
महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी | दि. ६ | पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी रस्ते क्षमता आणि शहररचनेतील मर्यादा यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाकांक्षी आणि धक्कादायक घोषणा केली आहे. पुण्यात केवळ ९ टक्के रस्ते असून, त्यावर क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक वाहने धावत आहेत. परिणामी, शहरातील प्रमुख चौकांवर कासवगती वाहतूक ही नित्याचीच बाब झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी पुण्यात तब्बल ५४ किलोमीटर लांबीचे भूमिगत बोगदे उभारून ‘पाताललोक’सदृश रस्ते तयार केले जाणार असून, यासाठी ३२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कात्रज चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, “देशातील इतर महानगरांमध्ये विकास आराखड्यात १८ ते २२ टक्के रस्ते आहेत, मात्र पुण्यात देशातील सर्वात कमी रस्ते आहेत. पूर्व–पश्चिम रस्ते मोठे असले तरी उत्तर–दक्षिण रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी वाढते. याच पार्श्वभूमीवर भूमिगत बोगद्यांचा पर्याय निवडण्यात आला आहे.”
या बोगद्यांच्या माध्यमातून कात्रजपासून पुण्यातील अनेक महत्त्वाचे भाग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. येरवडा ते खडी मशीन, स्वारगेट, रेसकोर्स, जगताप डेअरी ते सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी, खडकी या सर्व भागांमध्ये बोगद्यातून थेट वाहतूक मार्ग उपलब्ध होणार आहे. यासोबतच प्रमुख ३२ रस्त्यांचे आधुनिकीकरण, २१ नवे उड्डाणपूल, मेट्रोचा विस्तार, ई-बस खरेदी आणि ‘एआय’च्या मदतीने वाहतूक व्यवस्थापन अशी बहुआयामी योजना राबवली जाणार आहे.
पुण्याला खऱ्या अर्थाने ‘मेट्रो सिटी’चा दर्जा देण्यासाठी २०३० पर्यंत पायाभूत सुविधांसाठी ४४ हजार कोटींचा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आराखडा तयार करण्यात आला आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५८० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असून, त्यात पुण्याचा वाटा सध्याच्या ७० अब्ज डॉलरवरून २८० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “याचा अर्थ पुण्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे,” असा विश्वासही त्यांनी दिला.
याशिवाय, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमुळे अतिक्रमण, अवैध बांधकाम आणि महापालिकेतील ‘चिरीमिरी’ पूर्णपणे बंद होईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. ‘एआय’च्या माध्यमातून नकाशे मंजूर होणार असून, प्रशासन अधिक पारदर्शक बनेल. रिंग रोडमुळे वाहतूक ४० टक्क्यांनी कमी होईल, समान पाणीपुरवठा योजना, कचऱ्याचे १०० टक्के बायोमायनिंग, ३२० स्मार्ट शाळा—या सर्व घोषणांनी फडणवीसांनी पुण्याच्या भविष्यासाठी एक व्यापक आणि धाडसी व्हिजन मांडले आहे.
