AUS vs ENG 5th Test: ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक कहर! इंग्लंडच्या गोलंदाजांची हवा काढत झळकावले शतक

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी | दि. ६ | अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेड अक्षरशः धगधगताना दिसला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३८४ धावांचा पाठलाग करताना हेडने सिडनीच्या मैदानावर खणखणीत शतक झळकावत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला. तिसऱ्या दिवशी त्याने केलेल्या वादळी फलंदाजीमुळे इंग्लंडचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले. हे शतक केवळ धावांच्याच दृष्टीने नव्हे, तर विक्रमांच्या बाबतीतही ऐतिहासिक ठरले असून, हेडने असा पराक्रम केला आहे जो यापूर्वी जगात फक्त चारच फलंदाजांना जमला होता.

हेडने १०५ चेंडूंमध्ये १७ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. ४०व्या षटकात चौकार खेचत त्याने शतकाचा टप्पा ओलांडला. हे त्याचे या अॅशेस मालिकेतील तिसरे शतक ठरले, तसेच कसोटी कारकिर्दीतील १२वे शतक आहे. विशेष म्हणजे, एका अॅशेस मालिकेत तीनपेक्षा अधिक शतकं झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला. याआधी २००२-०३ मध्ये मॅथ्यू हेडनने तीन शतकांचा पराक्रम केला होता, मात्र हेडने तो टप्पाही ओलांडत नवा इतिहास रचला.

या कामगिरीसह ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या दिग्गजांच्या यादीत आपलं नाव कोरलं आहे. जो डार्लिंग, बिल वूडफुल, आर्थर मॉरिस, बिल लॉरी, मिचेल स्लॅटर आणि मॅथ्यू हेडन यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत तो आता उभा राहिला आहे. इतकंच नव्हे, तर ऑस्ट्रेलियातील सात वेगवेगळ्या मैदानांवर कसोटी शतक झळकावणारा हेड जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. स्टीव्ह वॉ, जस्टीन लँगर, मॅथ्यू हेडन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी याआधी हा पराक्रम केला होता.

हेड अखेर १६६ चेंडूंमध्ये २४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १६३ धावांवर बाद झाला. त्याने अवघ्या १५२ चेंडूंमध्ये १५० धावा पूर्ण करत अॅशेस इतिहासातील सर्वात जलद १५० धावांच्या यादीत चौथे स्थान पटकावले. या यादीत अॅडम गिलख्रिस्ट, स्वतः ट्रॅव्हिस हेड आणि झॅक क्रॉली यांचा समावेश आहे. ही बातमी लिहिली जात असताना ऑस्ट्रेलियाने ८२ षटकांत ४ बाद ३३६ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडपेक्षा ४८ धावांनी पिछाडीवर होते. स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा क्रीजवर ठाम उभे होते, तर ट्रॅव्हिस हेडच्या ऐतिहासिक खेळीने सिडनी कसोटीला वेगळीच उंची मिळवून दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *