![]()
महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- पिंपरी चिंचवड, ६ जानेवारी, २०२६: सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्रिध्यात महाराष्ट्राचा ५९वा वार्षिक निरंकारी संत समागम भव्यदिव्य स्वरुपात दिनांक २४,२५ व २६ जानेवारी, २०२६ रोजी सांगली ईश्वरपुर रोड, सांगलवाडी, सांगली (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानांवर आयोजित करण्यात येत आहे. कृष्णा नदीच्या रमणीय काठावर वसलेले, स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांची कर्मभूमी तसेच कला आणि सांस्कृतिक वारसाने समृद्ध असलेल्या सांगली शहराला या वर्षी प्रथमच महाराष्ट्राचा प्रादेशिक संत समागम आयोजित करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.
आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांती आणि एकतेचा वैश्विक संदेश दिला जातो जो निःसंशयपणे सर्व मानवजातीच्या कल्याणार्थ आणि प्रेरणादायी असतो. या संत समागमाच्या यशस्वीतेसाठी २८ डिसेंबर २०२५ पासून विधिवत रूपात स्वेच्छा सेवाकार्याचा शुभारंभ करण्यात आला तेव्हापासूनच सांगली परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल सदस्य, स्वयंसेवक आणि भाविक भक्त समागम स्थळावर पोहोचून भक्ती, श्रद्धा आणि निष्काम भावनेने विविध सेवांमध्ये आपले योगदान देत आहेत.
निरंकारी संत समागमाची भव्यता केवळ त्याच्या व्यापक भौतिक स्वरूपापुरती मर्यादित नसून, देश-विदेशातून येणाऱ्या असंख्य श्रद्धालू भक्तांच्या निर्मळ भावना, आत्मिक आनंद आणि सामूहिक चेतनेत तिचे खरे प्रतिबिंब दिसून येते. निरंकारी संत समागम मानवतेचा असा एक दिव्य संगम असतो जिथे धर्म, जात, भाषा, प्रांत तसेच गरीब-श्रीमंत आदि भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्व मानव प्रेम, सौहार्दपूर्ण आणि समानतेच्या भावनेने सेवा, स्मरण आणि सत्संग करतात.
संत समागमाच्या तयारीला मोठ्या उत्साहाने, शिस्तबद्धतेने आणि समर्पणाने वेग आलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे विस्तीर्ण मैदाने सपाट केली जात आहेत, तर दुसरीकडे येणाऱ्या श्रद्धाळूच्या निवासाची ,भोजनाची, स्वच्छता गृहांची, आरोग्याची ,सुरक्षेची, आगमन-प्रस्थानाची व इतर सर्व मूलभूत सुविधांची तयारी केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांच्या सहयोगाने सत्संग मंडप, निवासी तंबू, शामियाना आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज असलेले सुनियोजित नगरी आकार घेत असलेले पाहायला मिळत आहे.
श्रद्धाळू भक्त सेवा हे आपले परम सौभाग्य मानून, संपूर्ण मर्यादा, विनम्रता आणि आनंदभावाने त्या सेवेचे निष्ठेने पालन करीत आहेत. भक्तांसाठी, सेवा ही केवळ कर्तव्य नाही तर आत्मिक आनंदाची अनुभूती घेण्याची एक पावन संधी आहे. समागमस्थळी सर्वत्र सेवा, प्रसन्नता आणि उत्साहाची दिव्य छटा अनुभवास येत असून, ती स्वतःमध्येच एक प्रेरणादायी आध्यात्मिक संदेश ठरत आहे.
येत्या काही दिवसांत, समागमस्थळाचे रूपांतर ‘भक्ती नगर’मध्ये होणार असून, देशभरातून येणारे लाखो संत-महात्मे व श्रद्धाळू येथे एकत्र येत मानवता, प्रेम आणि सद्भाव यांच्या या महासंगमाचे साक्षीदार ठरणार आहेत.
