पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक ही योजनांची निवडणूक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ६ | पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 15 मधील अमित राजेंद्र गावडे, राजू ऊर्फ शरद दत्ताराम मिसाळ, शैलजा अविनाश मोरे आणि शर्मिला राजू बाबर उमेदवारांसाठी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर परिसरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, “15 तारखेला होणारी ही निवडणूक नशिबाची नसून विकासाच्या योजनांची निवडणूक आहे. केंद्र सरकारच्या 55, राज्य सरकारच्या 48 तसेच केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील एकूण 124 योजना पुढील पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहेत. या योजनांचा थेट लाभ प्रभाग 14 आणि 15 मधील नागरिकांना मिळणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, अंध, अपंग, निराधार घटकांसाठीच्या योजनांपासून ते प्रधानमंत्री आवास योजनेसह सर्व महत्त्वाच्या विकास योजना महापालिकेच्या माध्यमातून शहरात आणल्या जातील. भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर विकासाचे केंद्र बनले असून, याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “विकसित भारत” या संकल्पनेअंतर्गत पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा निर्धार केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “विकसित राज्य” संकल्पनेतून शहरासाठी 2029, 2035 आणि 2047 पर्यंतचा विकास आराखडा तयार केल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. रस्ते, वीज, पाणी यांसह व्हिजन विकसित पिंपरी-चिंचवड 2047 हा प्रस्ताव नगरसेवक मांडतील आणि त्यासाठी आवश्यक निधी राज्य सरकार देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

४० वर्षांपासून प्रलंबित असलेला 12.5 टक्के आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी लावल्याचे सांगत, शास्ती कर माफी, तुकडेबंदी कायदा रद्द करणे, गुंठेवारी नियमितीकरण आणि अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

15 मार्च 2024 पूर्वी बांधलेल्या घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, पुढील महिन्यात पिंपरी-चिंचवडमधील सर्व घरांना स्वामित्व देण्याचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच रेड झोनचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

“खरा विकास भाजपने केला आहे आणि जनतेच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात केले.

👉 १५ तारखेला विकासासाठी, विश्वासासाठी आणि भविष्यासाठी आपले एक मत कमळाला देऊन सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *