महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी – मंगेश खंडाळे | दि. ६ | पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मधील राजकारण पुन्हा रंगतदार झाले आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि माजी महापौर आर. एस. कुमार तसेच अरुण थोरात यांचा प्रचारात सक्रिय सहभाग गावात दिसताच, विरोधकांमध्ये हलचल निर्माण झाली आहे. २०१७ मध्ये अमित गावडे यांच्या विरोधात या दोघांनी मैदानात लढत दिली होती, पण यावेळी उमेदवारी न मिळाल्यामुळे काही काळ प्रचारापासून दूर राहावे लागले होते. यंदा चित्र वेगळे वाटत होते—पण तेवढेच.
अरुण थोरात आणि आर. एस. कुमार हे दोघेही भाजपकडून प्रबळ इच्छुक. इच्छुक इतके की, तिकीट आपल्यालाच मिळणार, असा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर नव्हे, तर त्यांच्या समर्थकांच्या पोस्टरवर झळकत होता. पण राजकारणात आत्मविश्वासाला हमी नसते तिकीट न मिळाल्याने दोघेही काही काळ प्रचारापासून दूर — न नाराजी जाहीर, न समर्थन उघड; म्हणजे राजकीय ‘मौनव्रत’.
हे मौन आज सकाळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेनंतर तुटले. भाषणात विकासाच्या योजना होत्या, पण परिणामात राजकीय हिशेब होते. “ही निवडणूक व्यक्तींची नाही,” हा वाक्यप्रयोग इतका धारदार ठरला की, २०१७ मध्ये अमित गावडे (शिवसेना) यांच्या विरोधात उभे ठाकलेले चेहरे पुन्हा एकदा भाजपच्या प्रचारात दिसू लागले. — “राजकारणात भूमिका बदलतात, पण प्रवेश कधी बंद होत नाही.”
राजकारणी तज्ज्ञांच्या मते, आर. एस. कुमार आणि अरुण थोरात यांच्या सक्रियतेमुळे प्रभागातील मतदारांमध्ये भाजपच्या विरोधकांविरोधातील राजकीय जागरूकता वाढेल, परंतु प्रत्यक्षात याचा मुख्य फायदा अमित गावडे यांना होणार आहे. प्रभागातील नागरिक आणि कार्यकर्ते दोन्ही गटातील नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. गावडे यांचे अनुभव, स्थानिक कामगिरी आणि सातत्यामुळे मतदारांचा विश्वास अजूनही मजबूत राहिला आहे.
एकूणच, प्रभाग १५ मधील निवडणुकीचा खेळ आता अधिक खुला आणि रोमहर्षक झाला आहे. राजकीय ताकद, पूर्वीच्या अनुभवाचा फायदा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे गावडे यांची बाजू सध्या अधिक भक्कम ठरत आहे. आगामी दिवसांत प्रचाराची गती, नागरिकांचा प्रतिसाद आणि संघटनात्मक कामगिरी हा निर्णायक ठरवेल की प्रभागात कोण पुढे जाईल.
