महाराष्ट्र 24 : चिंचवड प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक १७ मधील हजारो कुटुंबांच्या डोक्यावर वर्षानुवर्षे घोंगावणाऱ्या ‘अनधिकृत’ या शब्दाला आता कायमची मूठमाती देण्याची वेळ आली आहे. केवळ आश्वासनांची आरती न करता प्रत्यक्ष कृतीचा राजकीय हातोडा उचलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले— “ही घरे अनधिकृत नाहीत, ती अधिकृतच होणार!” वाल्हेकरवाडीतील जाहीर सभेत त्यांनी प्रभाग १७ मधील अनधिकृत घरांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड देऊन नागरिकांना कायदेशीर दिलासा देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत घोषणा हवेत उडवण्याऐवजी, जनतेच्या मूलभूत प्रश्नावर थेट निर्णयाची घोषणा करून अजित पवारांनी राजकीय मैदानात ठळक रेषा ओढली.
या सभेत अजित पवारांनी भोईर कुटुंबाचा उल्लेख करत अनुभवाची आणि वारशाची राजकीय बाजू अधोरेखित केली. स्व. सोपानराव भोईर हे पिंपरी-चिंचवडचे महापौर राहिले, तर माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी प्रभाग १७ मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि नागरी सुविधांसाठी सातत्याने काम केले, असे सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या “फक्त घोषणाबाजी” राजकारणावर टोला लगावला. विकास म्हणजे केवळ फलक लावणे नव्हे, तर नागरिकांच्या रोजच्या अडचणी सोडवणे होय, असा स्पष्ट संदेश दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांसाठी थेट रणशिंग फुंकले. “प्रभाग १७ चा विकास हवा असेल, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमत द्या,” असे आवाहन करत मनीषाताई आरसुळ, भाऊसाहेब भोईर, शोभाताई वाल्हेकर आणि शेखर चिंचवडे यांच्या नावांवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. प्रशासनाचा अनुभव, राजकीय पकड आणि निर्णयक्षमता या त्रिसूत्रीवर विकासाची गाडी धावेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेच्या शेवटी अजित पवारांनी जनतेला आश्वासन नव्हे तर राजकीय हमी दिली. “सत्तेचा उपयोग खुर्चीसाठी नाही, तर नागरिकांसाठी करायचा असतो,” असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रभाग १७ मधील प्रत्येक प्रश्न शासनदरबारी मांडून मार्गी लावण्याचा शब्द दिला. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ही सभा म्हणजे केवळ प्रचार नव्हे, तर विकासाच्या अजेंड्यावर दिलेली ठाम राजकीय गर्जना ठरली.
